सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिकमध्ये प्रारंभ, राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण; नाशिकमध्ये घडला इतिहास, पार पडला भव्य दिव्य सोहळा

Foto
नाशिक: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला. या सोहळ्याने पवित्र कुंभमेळ्याचा अधिकृतपणे प्रारंभ झाला. नाशिकमधील रामकुंडावर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजाचे आरोहण करण्यात आले, तर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण विधी संपन्न झाला.

या ऐतिहासिक क्षणी धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांनी परिसर दुमदुमून गेला होता. नाशिकमध्ये सध्या धार्मिक आणि मंगलमय वातावरण असून, या पवित्र सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो व्हीआयपींना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये सर्व आखाड्यांचे प्रमुख, पुरोहित संघाचे पदाधिकारी, तसेच मंत्री, खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय होती. ध्वजारोहणानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मुख्य पर्वाला सुरुवात झाली आहे, ज्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे रामकुंड परिसरात ११ वाजून ४० मिनिटांनी आगमन झाले. याठिकाणी गोदा पूजनानंतर गंगा गोदावरी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अन्य  विधीवत धार्मिक विधीसह गोदावरी पूजनानंतर बरोबर १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा पार पडला.

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती येणे ही घटना नाशिकच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. कुंभाच्या ध्वजारोहणाला आतापर्यंत कधीही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान अशा सर्वोच्च पदांवरील व्यक्ती आल्या नव्हत्या. मात्र यंदा प्रथमच राष्ट्रपती या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. ३० ऑक्टोबरपासून गोदावरीच्या तीरावर ३ दिवसीय विशेष यज्ञ आणि धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे. आजच्या ध्वजारोहणानंतर उद्या १ नोव्हेंबरला श्ृंगेरी पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती होईल. 

प्रभू श्रीरामचंद्रांचे आगमन आणि प्रस्थान सिंहस्थादरम्यान
प्रभू श्री रामचंद्र वनवासाला चित्रकूट येथून आले त्यावेळीदेखील नाशिक क्षेत्री कुंभमेळा सुरू होता आणि सीता हरण झाल्यानंतर श्री रामचंद्रांनी प्रस्थान करण्याच्या वेळी देखील सिंहस्थ सुरू होता अशी नोंद आहे. नाशिकमध्ये भरणार्‍या कुंभमेळ्याला प्राचीन इतिहासातही नोंद आहे. इसवीसन ७३ मध्ये सातवाहन राजा याच्या कालावधीत सिंहस्थ झाल्याची नोंद पंडू लेणी येथेही आहे. दुसरी नोंद देवगिरीचा यादव दुसरा इसवीसन १००० मध्ये आढळते. सूर्यग्रहणाच्या वेळी गोदावरी-अरुणा (इंद्रकुडाकडून येणारी नदी)-वरूणा (आताची वाघाडी) आणि गोदासंगमस्थानी भरल्याची नोंद संगमनेर ताम्रपटावर आढळते.

दरम्यान, श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.२ मिनिटांनी गुरू ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश झाल्यापासून सिंहस्थ सुरू झाला आहे. यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी योग घेऊन आला आहे. साधारणतः गुरू ग्रह हा कोणत्याही राशीत १३ महिने कालावधीसाठी असतो. त्यामुळे सिंहस्थ सुद्धा १३ महिनेच असतो. परंतु यंदा सिंहस्थ हा २१ महिने इतक्या कालावधीचा राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार कोणताही ग्रह सरळ जातो किंवा वक्री होतो, म्हणजे मागील घरात परत येतो. आज ३१ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू असला तरी दोन वेळा त्यात खंड पडणार आहे.