नवी दिल्ली : टॅरिफच्या मुद्द्यात भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात राहिले. आली लहर केला कहर प्रमाणे अमेरिकेने भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लावला. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापार करार सुरू होते. जगातील उच्च टॅरिफपैकी अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ ठरला. व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर अमेरिकेने मोठी घोषणा केली आणि भारतावर लावलेल्या मुळ टॅरिफपैकी ७ टक्के टक्के टॅरिफ कमी करण्याची घोषणा केली. भारतावर मुळ टॅरिफ २५ टक्के होता जो आता १८ टक्क्यांवर आला. मात्र, अजूनही भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने लावलेल्या २५ टक्के टॅरिफ कायम आहे. तो लवकरच पूर्णपणे काढला जाईल. आता अमेरिकेचा भारतावर ४३ टक्के टॅरिफ आहे. दोन्ही देशातील व्यापार करारांबाबत मोठी घोषणा होईल. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचा भारतावर मोठा दबाव होता.
भारतावरील टॅरिफ कमी करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली. यावर रशियाने थेट उत्तरही दिले. नक्की अमेरिकेच्या दाव्यावर भारत काय बोलणार याकडे जगाच्या नजरा होत्या. शेवटी अमेरिकेच्या दाव्यावर भारताने आपली स्पष्टपणे प्रतिक्रिया मांडली आहे.
अमेरिकेच्या दाव्यावर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, मुळात म्हणजे भारताच्या ऊर्जा पुरवठ्याचा विचार केला तर अनेकदा स्पष्टपणे सांगितले की, १.४ अब्ज भारतीयांची ऊर्जा सुरक्षा ही सुनिश्चित करणे ही सरकारची प्राथमिक आणि सर्वात मोठी जबाबदारी आहे.
मुळात म्हणजे बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणणे हा एक मुलभूत भाग नक्कीच आहे. भारताने या काही गोष्टी पाहून पाऊले उचचली आहेत आणि भारत पुढेही तेच करत राहिल. रशियानेही यादरम्यान बोलताना म्हटले होते की, भारताने आपल्या ऊर्जा सहकार्याच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याचे कोणतेही कारण नाही.