चाकू हल्ला प्रकरणी गंगापूर पोलिसांची कारवाई
गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात सकाळी झालेल्या शिवीगाळीच्या वादाचे पर्यवसान रात्री चाकूहल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. २८ ऑक्टोबर रात्री घडली. या हल्ल्यात दत्तू संतोष भक्कड (वय २३, रा. गंगापूर) हा तरुण जखमी झाला आहे.
सहा जणांनी मिळून त्याला घेरून मारहाण केल्याचा, तसेच चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुधवारी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी चौकाजवळील बंडू यांच्या चहाच्या हॉटेलच्या ओट्याजवळ ही घटना घडली. आरोपी आतिष गायकवाड याने दत्तू भक्कड याला सकाळी आपण आणि राहुल फुलारे यांना शिवीगाळ का केली, असा जाब विचारला.
यानंतर आरोपींनी दत्तूला शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राहुल फुलारे याने हातातील चाकूने दत्तूच्या पोटावर, पाठीवर, कानाजवळ आणि डोक्याजवळ वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दत्तू गंभीर जखमी झाला. शहरातील वर्दळीच्या राजीव गांधी चौक परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
-- सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल --
या प्रकरणी जखमी दत्तूची आई छाया संतोष भक्कड (वय ४०, रा. सखारामपंतनगर, गंगापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल फुलारे, आतिष गायकवाड, पवन गायकवाड, करण शिंदे, चेतन गायकवाड आणि विशाल कापसे या सहा जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-- आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी --
गंगापूर पोलिसांनी या प्रकरणातील सहाही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील करीत आहेत.













