औरंगाबाद - मागील काही दिवसांपासून पोलिस खात्याला लाचेचे ग्रहण लागले आहे. औरंगाबादमध्ये गेल्या आठ दिवसांत तीन पोलिस कर्मचार्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. हजार, पाचशे रुपयांची लाज घेणारेच एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत. परंतु वर्दीचा धाक दाखवून लाखो रुपयांची वसुली करणारे मात्र मोकाटच आहेत. अशा वसुलीबहाद्दरांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
पोलिस दलातील कनिष्ठ कर्मचारी लाच घेताना पकडले जात असताना वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
पोलिस खात्याशी कोणतेही काम करायचे झाले तर पोलिसांना चिरीमिरी दिल्याशिवाय ते होत नाही, असे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांना तसा अनुभवही येत आहे. शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात व तेही बिनबोभाटपणे सुरू आहेत. हे पोलिसांना लाच देऊनच सुरू आहेत हे काही ज्योतिषांनी सांगण्याची गरज नाही. अवैध धंदे करणार्यांकडून महिन्याकाठी लाखो रुपयांच्या हप्त्याची वसुली पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. बंदी असतानाही शहरात गुटख्याची चौका-चौकातील पानटपर्यांवर राजरोसपणे विक्री होत आहे. देशी दारूची तर तळीरामाच्या सोयीनुसार जागोजागी अवैधरीत्या विक्री सुरू आहे.
जिल्ह्यात एकाही वाळूपट्ट्यांचा शासनाकडून लिलाव झालेला नाही. तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळूचा अवैध उपसा व वाहतूक जोरात सुरू आहे. वाळू वाहतूक करणार्या वाहनांमुळे बरेच अपघात झाले, त्यात अनेक निरपराध व्यक्तींचे बळी गेले आहेत. प्रशासन मात्र लाखो रुपयांचा हप्ता घेऊन वाळूमाफियांना पाठीशी घालत आहे. दोन नंबरचे अनेक धंदे सध्या जोरात चालू आहेत. ही हप्तेखोरीच अवैध धंद्यांना आश्रय देत आहे. यात अनेक बडे मासे सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अवैध धंद्यांना राजकीय वरदहस्त
अवैध धंदे करणार्यांना राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील अवैध धंदे करणार्यांवर कारवाई करण्यास धजावत नसल्याची माहिती समोर येत आहे. मागील आठ दिवसांत शहर पोलिस दलातील तीन कनिष्ठ कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून चिरीमिरी घेणार्यांचे धाबे दणाणले आहेत. केवळ कनिष्ठ कर्मचार्यांवर कारवाई होत असताना, लाखो रुपयांची वसुली करणार्यांवर कारवाई का होत नाही, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.















