पैठण, (प्रतिनिधी): प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड योजनेचा कारभारच सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. स्मार्ट कार्ड विधिवत सक्रिय करून त्यामध्ये रिचार्जची रक्कम भरल्यानंतरही अनेक वाहक प्रवाशांकडून प्रवासासाठी चक्क पूर्ण तिकीट आकारात असल्याचे निदर्शनात आले आहे.
त्यामुळे सुविधा देण्याच्या नावाखाली प्रवाशांना आर्थिक फटका बसत असून, संबंधित यंत्रणेच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्मार्ट कार्ड काढण्याची ३१ ऑगस्ट ही मुदत संपल्यानंतर एक सप्टेंबर पासून ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही ज्यांचे कार्ड सक्रिय नाही त्यांना पूर्ण तिकीट आकारले जात आहे. परंतु ज्यांचे कार्ड सक्रिय आहे यामध्ये रिचार्ज केले आहेत त्यांनाही प्रणाली सक्रिय नसल्यामुळे पूर्ण तिकीट आकारले जात आहे.
त्यामुळे प्रवासी व वाचका मध्ये खटके उडताना दिसत आहेत. आधीच स्मार्ट कार्ड काढताना प्रवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते तसेच आर्थिक दंड सहन करावा लागतो. स्मार्ट कार्ड कार्ड सक्रिय करणे, त्यामध्ये रिचार्ज करणे आणि आवश्यक ती सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरही प्रत्यक्ष प्रवासावेळी कार्डचा लाभ मिळत नसल्याने प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. कार्डमध्ये पैसे असूनही केवळ प्रणाली कार्ड स्वीकारत नसल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे प्रवासी व वाक्यामध्ये वादावादी खटके उडताना दिसत आहे.
प्रणाली सक्रिय नसल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. कार्डही आमचे, रिचार्जही आमचा आणि तरीही पूर्ण तिकीटही आम्हीच भरायचे, मग स्मार्ट कार्डचा उपयोग तरी काय? असा संतप्त प्रश्न प्रवासी विचारत आहेत. प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी स्मार्ट कार्ड सुविधा सुरू करण्यात आल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र तांत्रिक त्रुटींचा फटका प्रवाशांनाच सहन करावा लागत आहे.
कार्ड सक्रिय असूनही सवलतीचा लाभ न मिळणे आणि त्यानंतर पूर्ण तिकीट आकारणे हा प्रकार प्रवाशांवर अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे स्मार्ट कार्ड व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी, कर्मचाऱ्यांना असलेली माहितीची कमतरता आणि तक्रार निवारण व्यवस्थेची कार्यक्षमता यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम वसूल होत असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
स्मार्ट कार्डची सुविधा खरोखर प्रवाशांच्या हितासाठी आहे की केवळ कागदोपत्री योजना आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आलेल्या तिकिटांच्या रकमेबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे आणि प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक त्वरित थांबवावी, अशी तीव्र मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. अन्यथा स्मार्ट कार्डफ्च्या नावाखाली सुरू असलेल्या या मनस्तापाविरोधात प्रवाशांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.















