लखनौ : उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. कोणालाही हत्या झाल्याचा संशय येऊ नये म्हणून मृतदेह घेऊन रुग्णालयात गेला आणि तिथे त्याने रडण्याचं नाटकही केलं. मात्र त्याचं हे नाटक फार काळ टिकू शकलं नाही. पतीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, तिचं कोणासोबत तरी प्रेमप्रकरण सुरू आहे असं त्याला वाटत होतं. महिलेच्या वडिलांनी पतीचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नासिरपीर भागात ही भयंकर घटना घडली. एका भाड्याच्या घरात राहणार्या दिलीप कुमार यादवने ८ ऑगस्ट रोजी आपल्या दोन भावांच्या मदतीने पत्नी शालिनीची हत्या केली. आरोपीने पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत तिच्या डोक्यावर कूकरचं झाकण व हँडलने वार करून तिचं डोकं फोडलं आणि मान पकडून तिला बाथटबमध्ये बुडवून तिचा जीव घेतला.
दिलीप यादवला अटक
शालिनी एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. सध्या पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे मुख्य आरोपी दिलीप यादवला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अभिमन्यू मांगलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप यादव याने ८ ऑगस्टच्या हत्या केली. कूकरच्या झाकणाने वार केल्यानंतर आणि बाथटबमध्ये बुडवल्यानंतर आरोपी २० मिनिटं बाहेर फिरत राहिला. परत आल्यावर त्याने भावांना फोन करून पत्नी बेशुद्ध झाल्याचा बनाव रचला आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. ९ ऑगस्ट रोजी नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.
२०१७ मध्ये केलं होतं लव्ह मॅरेज
शालिनी शहरातील एका खासगी शाळेत शिक्षिका होती. दिलीप आणि शालिनी यांनी ३ डिसेंबर २०१७ रोजी लव्ह मॅरेज केलं होतं. शादीपूर आणि नासिरपीर भागात भाड्याने राहत असताना दोघांमध्ये वाद वाढू लागले. पोलीस चौकशीदरम्यान आरोपी पतीने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आणि याच रागातून ही भयंकर घटना घडल्याचं कबूल केलं.