हौसेला खरचं मोल नसते. बुलेटवरून लग्नमंडपी अवतरलेली नवरी असो की हेलिकॉप्टरने नवरीची केलेली पाठवणी किंवा बैलागाडीतून आलेले वर्हाडी मंडळी हौसेपोटी माणूस काय काय करत नाही...! औरंगाबादमधील अशाच एका हौशीने चक्क सोन्याची चप्पल बनवलीय.
सोन्याला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण असे महत्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षयतृतीयेचा सण नुकताच पार पडला यादिवशी बंपर सोनेखरेदी झाल्याचीही नोंद आहे. पुरुषांमध्ये सोन्याची अंगठी, सोन्याचे कडे अथवा सोनसाखळी घालण्याची पध्दत आहे. मात्र, आपल्या हौसेपायी कुणी सोन्याची चप्पल बनवेल याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल मात्र, असा प्रकार घडला आहे औरंगाबाद मधील संजयनगरमध्ये.
व्यवसायाने हाॅटेलचालक असलेल्या संदिप राठोड या अवलियाने आपल्या हौसेखातर चक्क सोन्याची चप्पल बनवून घेतलीय. आणि विशेष म्हणजे ही चप्पल काही फक्त शोभेची वस्तू नाहीये. तर संदिप हे ही चप्पल दररोज आपल्या पायांमध्ये वापरतात. संदिप यांची बर्याच दिवसांपासुन सोन्याची चप्पल बनवण्याची इच्छा होती. मात्र, आर्थिक अडचणींमुळे ते आतापर्यंत सोन्याची चप्पल बनवू शकले नव्हते. आता मात्र व्यवसायात झालेल्या चांगल्या फायदामुळे ते आपली इच्छा पूर्ण करू शकले आहे.
ही चप्पल त्यांनी झवेरी बाजार येथील प्रकाश ज्वलेरी शाॅपचे मालक सचिन देवगिरीकर यांच्याकडून बनवून घेतली असुन यासाठी जवळजवळ दोन ते अडीच तोळे सोनं लागल्याचे संदिप राठोड सांगतात. एकुण 72 हजार रूपये खर्च त्यांना चप्पल बनविण्यासाठी आला आहे. एव्हढ्यावरच ते थांबणार नाहियेत तर हाती पैसा आल्यानंतर चांदीचा बुट बनवून घेण्याची इच्छा त्यांनी बोलुन दाखवली.