सोशल मीडियाचा उपद्व्याप ; शहर पुन्हा अशांततेच्या गर्तेत सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारे आता पोलिसांच्या रडारवर !

Foto

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या काळात शांत असलेले शहर अचानक धगधगू लागलेय. सोशल मीडियावरील उडाणटप्पू च्या कारवायांनी समाज स्वास्थ्य बिघडत आहे. या उपद्व्यापी मंडळींच्या कारनाम्याना शहरवासीयांनी मुळीच भीक घालू नये, शहर अशांत करणाऱ्या या घटकांना खड्यासारखे बाजूला करावे यातच सर्वसामान्यांचे हित असल्याचे बोलले जाते. निवडणूक आयोगाची आचार संहिता आणि पॉलिसी बडगा यामुळे निवडणुका शांततेत पार पडल्या. मात्र निवडणुकीच्या काळात व्हायरल झालेले काही आक्षेपार्ह व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर पसरविले जात आहेत. अशाच उपद्रवी जंतूंवर पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे. तरीही कारवाईच्या नावाखाली सर्वसामान्यांना वेठीस धरले जाऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचा बेसुमार वापर झाला. दर मिनिटाला एक पोस्ट व्हायरल होत होती. त्यामुळे मोबाईल अक्षरशः हैराण झाले. राजकीय पोस्ट, मेसेजेस, व्हिडिओज यांचा भडिमार करण्यात आला. गेल्या महिनाभराच्या काळात लाखो मेसेजेस आणि व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. 

इंटरनेट कंपन्यांनी या काळात तुफान कमाई केली. सोशल मीडिया हे प्रचाराचे प्रभावी हत्यार बनल्याने सर्वच राजकीय पक्षांनी याचा अनिर्बंध वापर केला.  त्यातच काही उपद्व्यापी मंडळींनी सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे मेसेज व्हायरल करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. मतदानाच्या दिवशी अशा खोट्या व्हिडिओज आणि मेसेजचा महापूर आला. मतदान करतानाचे व्हिडिओ, फोटोज त्याच बरोबर बोगस मतदान करणारांचे खोटे मेसेज आणि फोटोही व्हायरल करण्यात आले.  सोशल मीडियाच्या या उपद्रवाचा पोलीस तसेच प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. निवडणूक शांततेत पार पाडण्याचे प्रथम कर्तव्य पार पाडत पोलीस तसेच प्रशासनाने अशा फेक बातम्या आणि व्हिडिओजकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.  सोशल मीडियावरील व्हाट्सअप ग्रुप आणि फेसबुक पोस्ट तसेच मेसेजेस तपासले जात आहेत. धार्मिक तेढ निर्माण करणारे, तसेच भावना दुखावणारे मेसेजेस आणि व्हिडिओ तयार करणारे, शेअर करणारे आणि लाईक करणाऱ्यांवरही बडगा उगारण्यात येत आहे. महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या एका अल्पवयीनाला अटक करण्यात आली तर वैजापूर तालुक्यातही मतदानाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील तसेच जिल्ह्यातील काही व्हाट्सअप ग्रुप पोलिसांच्या रडारवर आहेत. या ग्रुपद्वारे धार्मिक भावना तसेच राजकीय लाभासाठी बदनामीकारक व्हिडिओ पसरवले गेले. आता हळूहळू या ग्रुपवरही पोलिसांची कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या या कारवाईने सोशल मीडियात सक्रिय असणाऱ्या मंडळींमध्ये मात्र घबराट निर्माण झाली आहे.

 निरपराधांना नाहक गोले जाऊ नये...
निवडणुकांचा माहोल आटोपला आहे. निवडणुका शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरील पोस्टच्या नावाखाली सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येऊ नये, असे बोलले जाते.  पोलिसांनी कारवाई करताना व्हिडिओ आणि पोस्टचा उगम यावरच लक्ष केंद्रित करावे. उगीचच शेकडो शेअर आणि लाईक करणाऱ्यांना वेठीस धरू नये असाही युक्तिवाद केला जात आहे. शेअर, लाइक, अथवा कमेंट करणाऱ्यांवर कारवाई करायला गेला तर हजारोंच्या संख्येने गुन्हे दाखल करावे लागतील.  तेवढे मनुष्यबळ पोलीस यंत्रणेकडे आहे का? हाही प्रश्नच आहे.

शहर अशांततेच्या गर्तेत
निवडणुकीच्या काळात शांत असलेले शहर गेल्या दोन दिवसात धगधगते आहे. गेले महिनाभर सामाजिक सलोखा आणि सौहार्दपूर्ण वातावरणाचा आदर्श शहराने घालून दिला. यापुढील काळातही सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी राजकीय पक्ष, नेते आणि समाजधुरीणांनी घ्यायला हवी. काही समाजकंटक आणि माथेफिरू धार्मिक सलोखा  बिघडवण्यासाठी टपून बसले आहेत. निवडणुकीच्या काळात या लोकांना कुणीही भीक घातली नाही. त्यामुळे आता या मंडळींनी पुन्हा एकदा उचल खाल्ल्याचे दिसते. शहरवासीयांनी यांचा डाव हाणून पाडावा अन  शांतता अबाधित राखावी, असा सूर सर्वसामान्यांतून उमटत आहे.