सोमय्यांचा दौरा अन् अधिकार्‍यांच्या पायाला भोवरा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वारंवार दौर्‍यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन चांगलेच वैतागून गेले आहे. कोणत्याही संवैधानिक पदावर नसतानाही अधिकार्‍यांच्या बैठका बोलावून त्यांना निर्देश देतात. परंतु सत्ताधारी पक्षाचे माजी खासदार असल्याने त्यांना कायदा, नियम कोणी शिकवावे, असा प्रश्न पडलेला आहे.
महसूूल प्रशासनाने एक वर्षाच्या विलंबाने दिलेल्या जन्म प्रमाणपत्रांमध्ये घोळ असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यांनी याबाबत विविध जिल्ह्यांत आणि राज्य पातळीवरही तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन काही ठिकाणचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले तर काही ठिकाणी गुन्हेेही दाखल झाले. परंतु किरीट सोमय्या महिन्यातून एक दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालय, सिटीचौक पोलीस ठाणे, सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी भेट देतात. एक तक्रारदार म्हणून प्रशासनाकडून त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाते. परंतु ते अधिकार्‍यांच्या बैठकी घेऊन निर्देश देतात. कारवाईचा आढावा घेतात यामुळे प्रशासन चांगलेच वैतागले आहे.