मुंबई : 28 जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनी आणि तपास करणाऱ्या संस्थेवर काही प्रश्न उपस्थित केले होते. या पत्रकार परिषदेचा आज तिसरा भाग होता. याआधी रोहित पवार यांनी 10 आणि 19 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. आज मुंबईत तिसरी पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघाताच्या अहवालात किती त्रुटी आहेत हे दाखवून दिलं आहे.
मला एक गोष्ट आज सांगायची आहे. मी डीजीसीए किंवा व्हीएसआरच्या विरोधात नाही. पण अजित पवारांचा जो अपघात झाला त्यात विमान व्हीएसआर कंपनीचं होतं. डीजीसीएकडून तपास केला जातो आहे. खरं काय घडलंय ते समोर येण्यासाठी मी बोलतो आहे. या कंपनीला कुणीतरी वाचवतं आहे याचा अंदाज आम्हाला येतो आहे. वाचवा वाचवीचा कार्यक्रम मोठ्या व्यक्तीमुळे होतो आहे का? असं असेल तर अजितदादांचा घात की अपघात हा तपास योग्य रितीने होणार नाही म्हणून मी बोलतो आहे असं रोहित पवार म्हणाले.
मुख्य पायलट काहीही बोलत नव्हता-रोहित पवार
रोहित पवार पुढे म्हणाले, लिअरजेट 45 एक्स आर हा विमानाचा प्रकार आहे. विमान आधी सुरतला गेलं होतं. इंधन क्षमतेच्या 90 टक्के इंधन विमानात होतं. या दोन्हीचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. नंतर या विमानाच्या उड्डाणाचे 85 तास उरले होते असं म्हटलं गेलं आहे. प्रत्यक्षात या विमानाच्या उड्डाणाचे 3 हजार तास हे जास्त झाले होते. दृश्यमानता कमी होती हे देखील समोर आलं आहे. मुख्य पायलट काहीच बोलत नव्हता ही बाबही समोर आली आहे असं रोहित पवार म्हणाले.
अहवालात अनेक चुका आणि त्रुटी आहेत
अजित पवारांच्या अपघाताचा अहवाल तयार करण्यासाठी एक महिन्याचा अवधी घेण्यात आला. त्यामुळे त्यात चुका होणं अपेक्षित नाही. तरीही या अहवालात बारामतीचा उल्लेख जिल्हा असा करण्यात आला आहे. बारामती नगरपरिषदेला महानगरपालिका म्हटलं आहे. त्यामुळे अहवाल गांभीर्याने बनवण्यात आला का? हा प्रश्न उरतो आहे असं रोहित पवार म्हणाले. तसंच विमान उजव्या बाजूला झुकलं असं म्हटलं गेलं आहे पण विमान डाव्या बाजूला झुकलं असं या ने म्हटलं आहे. जे साफ चूक आहे. या अहवालात झाडं असं म्हटलं आहे, झाडांना विमान धडकलं असं म्हटलं आहे. पण त्या ठिकाणी फक्त झुडपं आहेत तिथे विमान धडकलेलं नाही. अहवाल द्यायचा म्हणून दिला आहे बाकी काहीही या ठिकाणी दिसत नाही असंही रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांचा दावा काय?
विमान अपघात होण्याआधी काही लोक त्या ठिकाणी रेकी करायला आले होते असं काही लोकांचं म्हणणं आहे. या संदर्भातला तपास सीबीआय आणि सीआयडीने करावा असं आमची मागणी आहे असंही रोहित पवार म्हणाले. या सगळ्या गोष्टींमध्ये हेराफेरी करण्यात आली आहे. त्यामुळे तपास कुणी केला याचं नावच दिलेलं नाही. अजितदादांच्या अपघाताच्या अहवालासाठी कुठलं पथक होतं त्या पथकाचं नाव काय? ते अहवालात का देण्यात आलेलं नाही? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत. सीआयडीला आम्ही विचारलं तर ते सांगतात की आमचा योग्य दिशेने तपास सुरु आहे. पण योग्य दिशेने म्हणजे काय विचारलं तर ते सांगतात अहवाल आल्यानंतर आम्ही त्या अनुषंगाने तपास करु. मात्र अहवालात खूप त्रुटी आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.















