वडिलांच्या हत्येचा आरोपातून मुलाची निर्दोष मुक्तता

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) वडिलांची निघृण हत्या केल्याच्या आरोपाखाली खटला भरलेल्या मुलाची सबळ पुराव्याअभावी गंगापूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. गंगापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. बाहळकर यांनी १० मार्च रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

तालुक्यातील दहेगाव येथे ५ फेब्रुवारी २०२२ रोजी कडूबाळ मुरलीधर सोनवणे यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली होती. या प्रकरणी मयताचा मोठा मुलगा सुनील सोनवणे याने लहान भाऊ आरोपी अनिल कडूबाळ सोनवणे याच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. आरोपी अनिल हा वडिलांकडे लग्नाचा हट्ट धरून त्यांच्याशी नेहमी भांडण करत असे. 

घटनेच्या दिवशी अनिलने वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांची हत्या केली, असा पोलिसांचा दावा होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. या घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. पोलिसांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे साखळी पूर्ण करण्यात अपयशी ठरले.

रक्ताचे आरोपीच्या कपड्यांवर डाग सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता, परंतु रासायनिक विश्लेषण प्रयोगशाळेचा अहवाल अनिश्चित आला. त्यामुळे ते रक्त मयताचेच होते, हे सिद्ध झाले नाही. फिर्यादी सुनील सोनवणे याने न्यायालयात सांगितले की अनिलने गुन्ह्याची कबुली दिली होती.

 न्यायालयाने निकालात नमूद केले की, गुन्हा गंभीर असला तरी केवळ संशयाच्या आधारे कुणालाही दोषी ठरवता येत नाही. फिर्यादी पक्षाला आरोपीविरुद्धचा गुन्हा निःसंशयपणे सिद्ध करता आला नाही. त्यामुळे संशयाचा फायदा देऊन अनिल कडूबाळ सोनवणे याची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आणि या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. अमिनुल्ला अहेमद मोसीनअली खान यांनी काम पाहिले.