रायगड : आई-वडिलांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी आणि वडिलांना समजावण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय मुलाची स्वतःच्याच पोटच्या बापाने चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे ही घटना घडली आहे. या अमानुष हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पोलादपूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. साहिल ऊर्फ सई सचिन चिकणे (वय २४) असे मृत दुर्दैवी मुलाचे नाव असून, आरोपी बाप सचिन बजरंग चिकणे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मूळचे पोलादपूर तालुक्यातील ओंबळी येथील रहिवासी असलेले चिकणे कुटुंब सध्या लोहारे देऊळकोंड येथील आडरस्त्यावरील एका इमारतीत राहत होते. घटनेच्या दिवशी आरोपी सचिन चिकणे आणि त्याची पत्नी संध्या चिकणे यांच्यात अचानक घरगुती कारणावरून वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याचे पाहून २४ वर्षांचा मुलगा साहिल हा वडिलांना शांत करण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्ये पडला. मात्र, रागाच्या भरात सनक गेलेल्या आरोपी सचिनने मुलाचे ऐकून न घेता थेट स्वयंपाकघरातील सुरी (धारदार चाकू) उचलली आणि साहिलच्या छातीवर डाव्या बाजूला सपासप वार केले.
जागेवरच मृत्यू अन् बापाचे पलायन
छातीत धारदार सुरी घुसल्याने साहिल मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाला आणि अत्यंत गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आपल्याच हाताने मुलाचा खून झाल्याचे लक्षात येताच आरोपी सचिन चिकणे याने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
आईच्या तक्रारीवरून बापाला अटक
पोटच्या गोळ्याचा डोळ्यांसमोर असा अंत झाल्यानंतर आई संध्या सचिन चिकणे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या पतीविरोधात तक्रार नोंदवली. आईच्या फिर्यादीवरून पोलादपूर पोलीस ठाण्यात आरोपी सचिन चिकणे याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी बापाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला काही वेळातच अटक केली.