छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : बाबा फर्जन याच्या आलिशान बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच कोटी रुपयांची रोकड आणि मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. या प्रकरणातील पोलीस कारवाईवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर, बाबा फर्जनचा मुलगा फिरदोस फर्जन याने माध्यमांसमोर येत या जप्त केलेल्या संपत्तीवर आपला कायदेशीर दावा ठोकला आहे.
फिरदौस म्हणाले की, माझ्या वडिलांची शेती, घर आणि घरातून पोलिसांनी जप्त केलेले साडेपाच कोटी रुपये यावर आम्हा दोन्ही भावांचा हक्क आहे. तो माझ्या वडिलांच्या कष्टाचा आणि मेहनतीचा पैसा आहे. पोलिस छाप्यात सापडलेले घबाड आणि शस्त्रास्त्रांबाबत विचारले असता फिरदोस म्हणाले, मी जेव्हा २० वर्षांचा होतो तेव्हाच काही कारणांमुळे बाबांना सोडून आम्ही स्वतंत्र राहायला गेलो होतो.
आमच्यात कोणताही वाद नव्हता, मात्र तेव्हापासून आम्ही वेगळे आहोत. त्यामुळे त्यांच्या घरात असलेल्या बंदुका, शस्त्रसाठा आणि एवढ्या मोठ्या रकमेबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. हे सर्व घबाड सापडल्याचे आम्हाला मीडियाच्या माध्यमातूनच समजले. दरम्यान, आरोपी शीलाबाई साळवे हिची चार दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने मंगळवारी (दि.१४) पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची हर्सूल कारागृहात रवानगी केली. शीलाबाईच्या बहिणीचीही पोलिसांनी चौकशी केली. तर बाबा फर्जन यांचे बंधू चौकशीसाठी आले नव्हते.
मृत्यूबाबतही ठेवले अंधारात
वडिलांच्या मृत्यूबाबतही आपल्याला अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप फिरदोस यांनी केला आहे. बाबांना आधीपासूनच मधुमेहाचा त्रास होता. मी त्यांना शेवटचे २७ मार्च रोजी भेटलो होतो, तेव्हा ते व्यवस्थित होते. मात्र त्यांच्या निधनाची बातमी आम्हाला बाहेरच्या लोकांकडून मिळाली, असेही फिरदोस यांनी स्पष्ट केले. या पैशावर आणि संपत्तीवर आता वारसदार म्हणून कायदेशीर मार्गाने दावा करणार असल्याचे फिरदोस यांनी स्पष्ट केले.













