नवी दिल्ली : नीट पेपर लीक आणि देशातील नामांकित परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला आता प्रचंड मोठे राष्ट्रीय स्वरूप आले आहे. लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे हातात लाल गुलाबाचे फूल घेऊन आंदोलनात अधिकृतपणे सहभागी झाले आहेत. त्यांच्या आगमनामुळे आंदोलक विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
अमेरिकेच्या बॉस्टनमधून शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झालेले 'CJP' संस्थापक अभिजित दीपके हे विमानतळावरील दीड तासांच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत थेट जंतर-मंतर मैदानावर पोहोचले. दीपके मैदानावर पोहोचताच हजारो विद्यार्थ्यांनी 'जय भीम' आणि 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या पेपर लीक घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ पद सोडले पाहिजे, या मागणीवर सर्व आंदोलक ठाम आहेत.
सोनम वांगचुक यांनी आंदोलनात येताना सर्व कार्यकर्त्यांना केवळ पाण्याचे बॉटल आणि पोलिसांसाठी फुले आणण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार स्वतः वांगचुक आणि हजारो विद्यार्थ्यांनी ड्युटीवर असलेल्या दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना गुलाबाची फुले भेट देऊन गांधीगिरी मार्गाने शांततेत आंदोलन सुरू ठेवले आहे.
'तुकड़े-तुकड़े गँग' म्हणत आंदोलनात घुसण्याचा प्रयत्न!
दरम्यान, दुपारी आंदोलनादरम्यान हातात कॉकरोच मारणारा 'हिट' स्प्रे घेऊन घुसलेल्या व्यक्तीबाबत आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. या व्यक्तीने जंतर-मंतरवर घुसून 'कॉकरोच जनता पार्टी' ही 'तुकडे-तुकडे गँगचा' विस्तार असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावरून CJP चे समर्थक आणि त्या व्यक्तीमध्ये जोरदार धक्कामुक्की आणि बाचाबाची झाली. मात्र, परिसरात तैनात असलेल्या कडक पोलीस बंदोबस्ताने तात्काळ हस्तक्षेप करत त्या संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेऊन मैदानातून बाहेर काढले.
पोलिसांकडून ६ जण ताब्यात
मैदानावर सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत ६ जणांना ताब्यात घेतले आहे. आंदोलनाचे समर्थक आणि त्याचे विरोधक यांच्यात थेट हिंसक संघर्ष किंवा मोठा गदारोळ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. हा संभाव्य धोका आणि मैदानावर उसळलेला तणाव पाहता, पोलिसांनी कोणतीही जोखीम न पत्करता संशयास्पद हालचाली करणाऱ्या ६ जणांना प्रतिबंधात्मक/एहतियाती कोठडीत घेतले आहे.