आठवडाभराच्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला; लातूर-धाराशिवमध्येही कामांना वेग
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): मागील आठवडाभरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे चिंतेत सापडलेला मराठवाड्यातील बळीराजा आता सुखावला आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे खरिपाच्या पेरण्यांनी मोठा वेग घेतला असून, विभागात आतापर्यंत तब्बल ८९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मराठवाड्याच्या एकूण ४९ लाख ७२ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रापैकी ४४ लाख १६ हजार ५३२ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याने ९६ टक्के पेरणीसह आघाडी घेतली
असून, लातूर आणि धाराशिवसारख्या सुरुवातीला अपुरा पाऊस असलेल्या भागातही आता पेरण्यांचा टप्पा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. चांगल्या पावसामुळे सामुळे समाधानाचे वातावरण आहे.
पेरणीच्या पहिल्या टप्प्यात सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी बीड, जालना, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांतून कृषी विभागाकडे आल्या होत्या. त्यातही पाऊस नसल्याने पेरणी खोळंबली होती. कृषी विभागानेही पाहणी केली. मात्र गेल्या आठवड्याभरापासून चांगला पाऊस होत असल्याने छत्रपती
संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित मराठवाड्यात सोयाबीनची पेरणी सरासरीपेक्षा अधिक झाली आहे. कापूस, तूर आणि अन्नधान्य पिकांची पेरणी सरासरीपेक्षा कमी झाल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी दिली.
सर्वाधिक पेरणी सोयाबीनची
▶ मराठवाड्यात सोयाबीनची २४.३९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या १०६ टक्के आहे. याशिवाय ११.८९ लाख हेक्टरवर (८० टक्के) कपाशी लागवड झाली असून तुरीची पेरणी ३.५३ लाख हेक्टर (७९ टक्के) इतकीच झाली आहे. इतर पिकांचा विचार करता ७.७५ लाख हेक्टरवर (६६ टक्के) पेरणी झाली असून, मका (१०० टक्के), ज्वारी (८ टक्के), बाजरी (३६ टक्के), मूग (४४ टक्के) आणि उडीद (४६ टक्के) अशी पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील (छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड) एकूण खरीप पिकांची पेरणी ९० टक्के झाली आहे. लातूर विभागातील (लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली) पेरणी ८८ टक्के आहे.














