सोयगाव तालुक्याची पैसेवारी ४५ टक्के

Foto
दुसऱ्या ट्रिगरसाठी नुकसानीचे सर्वेक्षण होणार

सिल्लोड, (प्रतिनिधी) : सोयगाव तालुक्यातील ८७ गावांची नजर अंदाज पैसेवारी बुधवारी जाहीर झाली. मंडळांतील चार महसूल गावांची सरासरी पैसेवारी ४५ टक्के नोंदविण्यात आली आहे. ५० पैशांच्या आत पैसेवारी आल्याने तालुका दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरच्या छायेत आला आहे. आता खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सोयगाव मंडळाची पैसेवारी ४६, जरंडी ४७, बनोटी ४५, तर सावळदबारा मंडळाची ४४ टक्के नोंद झाली. पावसाने वेळेपूर्वीच उघडीप दिल्याने कापूस, मका, सोयाबीन आणि तुरीच्या पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल व कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. तालुक्यात सुमारे ४१ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे. 

नुकसानीचा अहवाल २ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना आहेत. मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत व महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करणार आहेत.

-- प्रत्येक शेताचे पंचनामे --
नुकसानीनुसार प्रत्येक शेताचा पंचनामा करून अहवाल जिल्हास्तरावर पाठविला जाणार आहे. त्यानंतर तो राज्यस्तरावर सादर होईल. अल्प कालावधीत मोठ्या क्षेत्राचे सर्वेक्षण करावे लागणार असल्याने यंत्रणेवर कामाचा ताण वाढणार आहे.