वॉशिंग्टन : स्पेनने अमेरिकेला इराणवरील हल्ल्यांसाठी दक्षिण स्पेनमधील लष्करी तळ वापरण्यास बंदी घातली आहे. या निर्णयामुळे संतापलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनला भयानक म्हणत त्यांच्याशी सर्व प्रकारचे व्यापारी संबंध तोडण्याची थेट धमकी दिली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांना असमर्थनीय आणि धोकादायक लष्करी हस्तक्षेप म्हटलं आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेला त्यांचे तळ वापरू देणे हे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन ठरेल, असा युक्तिवाद स्पेनने केला.
इराणवरील हल्ल्यांसाठी लष्करी तळ वापरू न दिल्याबद्दल ट्रम्प यांनी ब्रिटनवरही असहकार्य केल्याची टीका केली आहे, मात्र त्यांनी ब्रिटनला व्यापारावर निर्बंध आणण्याची कोणतीही थेट धमकी दिलेली नाही.
युरोपियन युनियनचा अडथळा
स्पेन हा युरोपियन युनियनचा सदस्य देश असल्यामुळे, आणि मध्ये वस्तूंची मुक्त वाहतूक चालत असल्यामुळे एखाद्या एकाच सदस्य देशावर व्यापार निर्बंध लादणे अमेरिकेसाठी अत्यंत गुंतागुंतीचे ठरणार आहे. जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनीही ट्रम्प यांना नुकतेच स्पष्ट केले आहे की, युरोपियन युनियनसोबतच्या कोणत्याही व्यापार करारात स्पेनचा समावेश असणे बंधनकारक आहे.
संरक्षण खर्चाचा वाद
ट्रम्प यांच्या या आक्रमक पवित्र्यामागे लष्करी तळांव्यतिरिक्त आणखी एक कारण आहे. ट्रम्प यांनी नाटो () मित्र राष्ट्रांनी आपल्या जीडीपीच्या 5 टक्के खर्च संरक्षणावर करावा अशी मागणी केली होती, ज्याला स्पेन सरकारने विरोध केला आहे.
अमेरिकन प्रशासनाचा दावा
ट्रम्प आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचा दावा आहे की, अमेरिकेला स्पेनच्या उत्पादनांवर कायदेशीररीत्या बंदी घालण्याचा अधिकार आहे. मात्र, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीयर यांनी याबाबत लगेच स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळले. दुसरीकडे, स्पेन सरकारने अमेरिकेला खासगी कंपन्यांची स्वायत्तता, आंतरराष्ट्रीय कायदा आणि - मधील द्विपक्षीय करारांचा आदर राखण्याची आठवण करून दिली आहे.
दोन्ही देशांमधील मोठी आर्थिक उलाढाल
2025 च्या आकडेवारीनुसार, अमेरिका आणि स्पेनमध्ये मोठा व्यापार होतो. अमेरिकेने स्पेनला सुमारे 26 अब्ज डॉलरची उत्पादने निर्यात केली होती, तर स्पेनमधून 21 अब्ज डॉलरची आयात केली होती. यात स्पेनकडून प्रामुख्याने फार्मास्युटिकल उत्पादने आणि ऑलिव्ह ऑइल अमेरिकेत येते.