दिव्यांग विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्हासह प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पदवी पुरेशी नसून संगणक साक्षरता, कौशल्य विकास, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावरच यश संपादन करता येते. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवावे, असे प्रतिपादन सिल्लोड तहसीलदार अंकिता टाकभाते  यांनी केले.

सिल्लोड येथील लॉजिक कॉम्प्युटर्स येथे आयोजित एमएस - सीआयटी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी काशिनाथ ताठे, मंडळ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी लॉजिक कॉम्प्युटर्सचे संचालक जितेंद्र पाडवे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या
विविध शैक्षणिक, कौशल्यविकास व करिअर मार्गदर्शन उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी "महाराष्ट्र साक्षर करू या" या उपक्रमाची घोषणा केली.

कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील तंत्रज्ञान असून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना विषयी जागरूक करून तंत्रज्ञान साक्षर करण्यासाठी लॉजिक कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मार्गदर्शन करताना तहसीलदार अंकिता टाकभाते यांनी संगणक शिक्षणाचे वाढते महत्त्व, स्पर्धा परीक्षांची तयारी, शासकीय सेवांमधील संधी, वेळेचे नियोजन, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

एमएस सीआयटीसारख्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी डिजिटलदृष्ट्या सक्षम होऊन रोजगाराच्या नव्या संर्धीचा लाभ घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.  यावेळी एमएस-सीआयटी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. 

त्यांच्या जिद्दीचे, चिकाटीचे आणि यशस्वी वाटचालीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच संस्थेचे कर्मचारी जावेद पठाण, आकाश अरके, जयदीप जैवल व राहुल दांडगे उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.