मुंबई : राजधानी दिल्लीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं असून 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेचं तर 3 डिसेंबर रोजी राज्यसभेचं अधिवेशन होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या इंडिया आघाडीनेही तातडीची बैठक बोलावली आहे. संसदीय अधिवेशनासाठी इंडिया आघाडीची बैठक बोलावण्याचा निर्णय काँग्रेसच्या नेतृत्वात घेण्यात आला. मात्र, आता या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती नसणार आहे.
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर होत असलेल्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने तातडीची बैठक बोलवली आहे. मात्र, खासदार सुप्रिया सुळे उद्याच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, पक्षाच्या वतीने इतर खासदार या बैठकीत उपस्थित राहतील. शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे सांगण्यात आले. तर, लोकसभेच्या विशेष अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे थेट रविवारी रात्री दिल्लीत पोहोचतील, अशी देखील माहिती आहे.
संजय राऊतही बैठकीला अनुपस्थित राहणार
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील उद्याच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, पक्षाच्या वतीने इतर खासदार उपस्थित राहतील, अशी माहिती स्वत: संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे, इंडिया आघाडीच्या बैठकीला दोन प्रमुख पक्षाचे दोन प्रमुख नेते उपस्थित राहणार नसल्याने दिल्लीत नेमकं काय घडतंय, याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली आहे.
शिवसेना खासदारांची बैठक, व्हीपही जारी
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनातील पक्षाची भूमिका आणि संसदीय कामकाजासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. शनिवार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील नंदनवन बंगल्यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शिवसेनेच्या सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, शिवसेना खासदारांना व्हीप देखील जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, लोकसभेच्या विशेष सत्रासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत हजर राहण्याचे निर्देश सर्वच खासदारांना देण्यात आले आहेत.
काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आज काँग्रेसची बैठक पार पडली, या बैठकीला राहुल गांधी देखील उपस्थित होते. या बैठकीत इंडिया आघाडीची बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, प्रियंका गांधी यांचीही बैठकीला उपस्थिती होती. त्यामध्ये, द्रमुकलाही इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती आहे. संसदेतील रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार असून सभागृहातील कामकाजासाठी संयुक्त रणनीती आखण्यात येईल, अशी माहिती आहे.