मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी दिल्लीतील नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील दिला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी शिंदे पडद्यामागे अजूनही यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी एकनाथ शिंदे अजूनही गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी सातत्याने संपर्कात आहेत. यासंदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
बुधवारी रात्री ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर यशस्वी करुन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप करणार का, ही चर्चा पुन्हा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी आपण पक्षाशी इमानदार राहू, अशा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, आता या नव्या भेटीने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आठ खासदारांची ही बैठक पार पडल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांना भेटल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उशीरा सुरु झालेली ही बैठक पहाटेपर्यंत सुरु होती, अशी माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित असल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाकडून या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदार व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या खासदारांना शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिली गेल्याची माहिती आहे. मात्र, ठाकरेंच्या खासदारांना संपर्क केल्यानंतर ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंत दोघांनाही अशी कोणतीही बैठक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. अरविंद सावंत यांनी म्हटले की, मी काही झालं तरी शिंदे सोबत जाणार नाही. तर ओमराजे निंबाळकर यांनीही, मी दोन टर्मचा खासदार आहे. माझ्या दोन टर्मपासून हीच चर्चा सुरू आहे. चुकीच्या बातमीवर मी स्पष्टीकरण देणार नाही. अशी कुठली बैठक झाल्याचं मला माहिती नाही. बैठक झाली असेल तर फोटो द्यावेत, असे आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी दिले.
भगवा घेऊन आलो भगवा पांघरून जाणार: अरविंद सावंत
आज सकाळी मला धक्का बसला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार शिंदे गटात जाणार असं छापलं आहे. अनिल देसाई यांना वगळलं गेले. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मला उभं चिरलं तरी मातोश्रीची निष्ठा दिसेल. उद्धव साहेबांनी मला खासदार केले. आईच्या दुधाशी प्रतारणा करणार नाही. भगवा घेऊन आलो भगवा पांघरून जाणार, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय: संजय राऊत
ऑपरेशन जे असतं ते एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचे ऑपरेशन होते तेव्हा ते डेडबॉडीचं ऑपरेशन असतं. देवेंद्र फडणवीस यांनी सध्या त्यांच्या पक्षाची डेडबॉडी केलेली आहे. सध्या जे ऑपरेशन सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे करत आहेत. शिवसेनेचे नऊ खासदार हे एकजुटीने एकत्र आहेत. मी काही नावं वाचली तर मला हसायला आले. हे अत्यंत हास्यास्पद आहे. उद्या माझे नाव टाकतील. आदित्य साहेबांचे देखील नाव टाकतील. या प्रकारच्या बातम्या वातावरण गरम करण्यासाठी पेरल्या जात आहेत किंवा आम्ही काहीतरी घडामोडी करत आहोत हे दाखवण्यासाठी केले जात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
सध्या मीडियाकडे कुठले विषय राहिले नाही : विजय वडेट्टीवार
सध्या मीडियाकडे कुठले विषय राहिले नाही, लोकांचे प्रश्न दिसत नाही, आर्थिक दुरावस्था दिसत नाही, महागाई दिसत नाही, फक्त फोडाफोडीच्या बातम्यांना महत्त्व आहे. हा फुटला, तो तिकडे गेला, मीडियाला फक्त हेच विषय दिसतात, अशी टिप्पणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांची अशी बैठक झाल्याचे मी ऐकले आहे, मला त्या संदर्भात फारशी माहिती नाही. तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. महाराष्ट्र आणि देशात फोडाफोडीच्या राजकारणात ऊत आलेला आहे. आता नैतिकता, नीतिमत्ता काहीच राहिलेली नाही, कोण कुठेही जावं, कुणाच्याही मांडीवर जाऊन बसावं, त्याने डोक्यावर घ्यावं आणि मग परत पायाखाली तुडवावं, ही राजकारणातील फॅशन झालेय, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.