भरधाव कारने दुचाकीसह रिक्षाला उडविले, तरुण ठार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : हर्सूल ते जळगाव रोडदरम्यान रविवारी (दि.८) दुपारी भरधाव कारने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकी आणि रिक्षाला भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार केटरिंग व्यावसायिक बुधाराम बिष्णोई (३३, रा. बालाजीनगर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. कारचालक साहिल कैलास राऊत (बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ११:३० च्या सुमारास साहिल राऊत हा आपल्या कारने (एमएच-२८-एझेड-४१४७) हर्सूलकडून सिडको बसस्थानकाच्या दिशेने जात होता. जळगाव रोडवरील खासदार काळे यांच्या घरासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजक तोडून दुसर्‍या लेनमध्ये घुसली. यावेळी समोरून येणार्‍या सुधाराम बिष्णोई यांच्या दुचाकीला (एमएच-२०-एचसी ००८७) कारने जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कार पुढे जाऊन जावेद शेख यांच्या रिक्षालाही (एमएच-२०-बीटी-८९९६) धडकली. जखमींना घाटीत दाखल केले. मात्र गंभीर जखमी बुधाराम बिष्णोई यांचा दुपारी २ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.