वैजापूर, (प्रतिनिधी) शिऊर येथून शिऊर बंगल्याकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.
ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता शिऊर बंगला रस्त्यावरील हॉटेलजवळ घडली. गणेश पुंडलिक जपे (३५, रा. चिकटगाव, ता. वैजापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. गणेश जपे आणि ऋषिकेश मच्छिंद्र ठेंगडे (२७, रा. शिऊर) हे दोघे दुचाकीने (एमएच २० सीओ ४०५७) शुक्रवारी रात्री दहा वाजता शिऊर गावाकडून बंगल्याकडे जात होते. त्यावेळी शिऊर बंगल्याकडून येणाऱ्या टिप्परने (एमएच २० सीटी ५९९६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यात गणेश जपे यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋषिकेश ठेंगडे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. गणेश जपे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिऊर आरोग्य उपकेंद्रात हलविला. जपे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैभव रणखांब यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच टिप्परचालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी शिऊर टिप्परचालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.












