मोफत सर्वरोग निदान, उपचार, रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान, उपचार व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते या शिबारचे उद्घाटन झाले.

शिबिरात ३ हजार हुन अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना तपासणीअंती मोफत औषधोपचार देण्यात आला. नगर परिषद सिल्लोड, उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड व आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरजू व विविध आजारांच्या रुग्णांना मोफत उपचार मिळावा यासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवला.

सोनोग्राफी, एक्स रे, ईसीजी, रक्ताच्या तपासणी, औषधी अशा प्रकारच्या सुविधा मोफत देण्यात आल्या. शिबिरात सहकार्य करणारे डॉक्टर्स, नर्स, तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. येथे आलेल्या रुग्णांसाठी आयोजकांच्या वतीने चहा, पाणी तसेच भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

शिबिरात १५७ जणांनी केले रक्तदान :
शिबिरात एकूण १५७ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्ताची वाढती गरज लक्षात घेता दरवर्षीपलप्रमाणे सर्वरोग निदान व उपचार शिबिरात हे शिबिर आयोजित करण्यात येते.
रक्तदात्यांसाठी आवश्यक आरोग्य तपासणी, अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. आमदार अब्दुल सत्तार, नगराध्यक्ष अब्दुल समीर व आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानत भविष्यातही अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. नॅशनल हॉस्पिटल अॅड मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय उपचारांसह सर्व आरोग्य सुविधा शहरातच उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. 

अद्ययावत यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा तसेच २४ तास रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करीत येत्या वर्षभरात मेडिकल कॉलेजचे काम पूर्णत्वास येईल असे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि असंतुलित आहारामुळे विविध आजार वाढत असून वेळीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य हेच खरे धन असून निरोगी समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने जागरूक राहून व्यायामावर भर द्यावा असेही त्यांनी नमूद केले. नगर परिषदेच्या माध्यमातून खुले व्यायाम शाळा ही संकल्पना यापूर्वी आपण शहरात राबविली. यात वाढ करून आवश्यक तेथे व्यायाम शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी श्री. मुर्डेश्वर देवस्थानचे पिठाधिश महंत ओंकारगिरी महाराज, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, माजी सभापती रामदास पालोदकर, देविदास लोखंडे, जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश वैष्णव, नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजगर पठाण, कृउबा समितीचे उपसभापती संदीप राऊत, संचालक नंदकिशोर सहारे, जयराम चिंचपूरे, शेख जावेद, नानासाहेब रहाटे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले. नगर परिषदेचे प्रकल्प समनव्यक देवेंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक तर शेवटी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार मानले.