क्रीडा मैदाने खेळाडूंचे भवितव्य घडवतात : मंत्री अतुल सावे लोळगे चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
खेळ ही केवळ करमणूक नसून मुलांमध्ये संघर्ष करण्याची वृत्ती, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. खेळात हार-जीत होतच राहील; परंतु मैदानावर स्वतःची सर्वोत्तम कामगिरी करणे आणि खिलाडूवृत्ती जोपासणे हेच प्रत्येक खेळाडूसाठी सर्वात महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ओबीसी कल्याण मंत्री आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले.
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे (एडीसीए) माजी अध्यक्ष आणि सनदी अधिकारी स्व. सुभाष लोळगे यांच्या स्मरणार्थ आयोजित लोळगे चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून अतुल सावे बोलत होते. मंत्री सावे म्हणाले, आज आपण ज्या देखण्या व हिरवळीने नटलेल्या मैदानावर उभे आहोत, ते मैदान असोसिएशनला मिळवून देण्यासाठी लोळगे साहेबांनी प्रशासकीय पातळीवर प्रचंड संघर्ष केला होता. त्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळेच शहराला हे वैभव लाभले आहे.
क्रिकेट मोठे करिअर : करसन घावरी
उद्घाटन सोहळ्यास भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज कसोटीपटू करसन घावरी यांची प्रमुख उपस्थिती होती. घावरी म्हणाले, दीर्घ काळानंतर या ऐतिहासिक शहरात येऊन लोळगे
स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा भाग होता आल्याचा मला मनापासून आनंद होत आहे. स्थानिक क्रिकेटचा विकास, मार्गदर्शन किंवा कोचिंगसाठी मी संभाजीनगरसाठी एका फोन कॉलवर सदैव उपलब्ध राहीन. एडीसीएचे सचिव शिरीष बोराळकर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची पार्श्वभूमी मांडली. कार्यक्रमास एडीसीए उपाध्यक्ष उमेश डबरी, सचिन मुळे, खजिनदार अनिल इरावणे, सहसचिव करण डोगरा, स्पर्धेचे मुख्य संयोजक विशाल लोळगे, कार्यकारिणी सदस्य सुशील वकील, सुयोग माछर, सुधीर भालेराव, निखिल मिटकर, हेमंत मुळे आणि आजीव सभासद अरुण गुदगे, किरण जोशी, गौतम नंदावत, मोहन बोंबले, जगदीश भावठाणकर, मनिंदरसिंग कानसा, विष्णू लोखंडे, मोहन बोरा, कल्पेश शाह, मनोज शाह, स्पर्धा आयुक्त राहुल टेकाळे आदी उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions