तरुणीचा पाठलाग करून अश्लील वर्तन रोडरोमिओला ३ महिन्यांचा कारावास

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो):
पोलिस भरतीचा सराव करून दुचाकीने घरी परतणाऱ्या एका तरुणीचा पाठलाग करत, तिला रस्त्यात अडवून अश्लील वर्तन करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोरखाडे यांनी आरोपीला तीन महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. गगन तफजुल गगन अनिस (वय २०, रा. सेव्हनहिल) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या निकालामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि तरुणींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना मोठा चपराक बसली आहे.
पोलिस भरतीची तयारी करणारी तरुणी ३० जून २०२५ रोजी पहाटे टी.व्ही. सेंटर
चौकातील पॉवर हाऊस मैदानावर पोलिस भरतीच्या सरावासाठी गेली होती. सकाळी सातच्या सुमारास घरी परतत असताना विद्यानगर परिसरात एका रोडरोमिओने दुचाकी तिच्या स्कुटीसमोर आडवी लावत तिचा विनयभंग केला. तरुणीने आरडाओरडा करत विरोध केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागल्याचे पाहून आरोपी तेथून पळाला. मात्र काही अंतरावर त्याने पुन्हा तिचा पाठलाग सुरू केला. यावेळी तरुणीने पुन्हा
आरडाओरडा केल्याने नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला. पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने यापूर्वीही तिचा रस्ता अडवून अंगाला जबरदस्तीने हात लावत विनयभंग केला होता.
५ हजार दंड
तपास अधिकारी उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी गगन तफज्जुल याला बीएनएसच्या कलम ७५ अन्वये तीन महिन्यांचा कारावास आणि ५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सय्यद मुख्तार यांनी काम पाहिले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions