औरंगाबाद: स्थानिक सत्तेचे केंद्र असलेल्या महानगरपालिकेतील अर्थपूर्ण समिती म्हणून ओळखल्या जाणार्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक 4 जून रोजी होणार आहे. याकरिता आज शुक्रवारी दिवसभर अर्ज वाटप करण्यात येत आहेत. दुपारपर्यंत भाजप पदाधिकार्यांनी 3 तर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी 2 अर्ज नेले असल्याचे समजते.
मनपातील महत्त्वाची व अर्थपूर्ण अशी समिती असलेल्या स्थायी समितीमधील 8 सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने ते सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन 8 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता 4 जून रोजी स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक होणार आहे. याच दिवशी विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतीपदांचीही निवड होणार आहे. त्यासाठी आज शुक्रवारी अर्ज वाटप करण्यात येत आहेत.
सकाळी भाजपच्या वतीने उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड यांनी स्थायी समिती सभापती पदाकरिता 3 तर शिक्षण व आरोग्य सभापती पदासाठी प्रत्येकी दोन व महिला बालकल्याण उपसभापती पदाकरिता 2 अर्ज नेले आहेत. शिवसेनेच्या वतीने सभागृह नेता विकास जैन यांनी स्थायी समिती सभापती पदासह तर इतर विषय समित्यांकरिता प्रत्येकी दोन अर्ज नेले आहेत.
भाजपच्या गोटात धाकधूक
युतीत ठरल्याप्रमाणे यंदाचे सभापती पद भाजपच्या वाट्याला येणार आहे. भाजपकडून पूनम बमणे, राजू शिंदे आदींची नावे चर्चेत असताना शिवसेनेने सभापती पदाकरिता अर्ज नेल्याने भाजपच्या गोटात धाकधूक वाढली आहे. उद्या अर्ज नगर सचिव कार्यालयात सादर करायचे आहेत.