दानवे यांच्या प्रचाराला स्टार प्रचारकांचा ताफा!

Foto

औरंगाबाद: राज्यभर गाजलेल्या सेना-भाजपमधील वादावादीने औरंगाबाद व जालना हे लोकसभा मतदारसंघ चांगलेच प्रकाशझोतात आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे उपनेते खा.चंद्रकांत खैरे यांचे राजकीय भवितव्य पणाला लागलेली ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष या दोन मतदारसंघांकडे लागले आहे.

 भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतर या दोन्ही मतदारसंघात फारशी टक्‍कर पाहायला मिळणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, राजकीय गणित असे काही फिरले की, या दोन्ही नेत्यांना विजयासाठी चांगलीच धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र आहे. जालन्यात सेना रुसली तर औरंगाबादमध्ये भाजप असंतुष्ट आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही नेत्यांचा चांगलाच कस लागताना दिसतो. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी शिल्‍लक आहे. प्रदेशाध्यक्षांसाठी भाजपची स्टार प्रचारकांची फौजच मैदानात उतरली आहे. उद्या मुख्यमंत्री सिल्‍लोडला प्रचार सभा घेत आहेत तर योगी आदित्यनाथ यांची पैठणला सभा होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही जालन्यात सहभाग घेत आहेत.