रोजगार हमीची कामे सुरू करून दुष्काळात मजुरांच्या हाताला काम द्या : आमदार भुमरे

Foto
पैठण, (प्रतिनिधी) तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी गंभीर होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करू नका, नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या, तसेच रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करून दुष्काळाच्या काळात मजुरांच्या हाताला काम द्या, असे निर्देश आमदार विलास भुमरे यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले. पैठण पंचायत समितीमध्ये आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ परिस्थितीची आढावा घेण्यात आली. 

यावेळी सभापती वैशाली बोंबले, उप सभापती संजय लगाने, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, अप्पासाहेब निर्मळ, नंदू पठाडे, कार्यकारी अभियंता गणेश हासे, कृषी अधिकारी विकास पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, महावितरणचे शाखा अभियंता सुमित वंगळ, राजेंद्र वाघमोडे, बद्रीनाथ बोंबले यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना आ. विलास भुमरे यांनी सांगितले कि, तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेताना जायकवाडी धरणातील पाणीसाठा, हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यांमधील पाण्याचे नियोजन ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील काळात
पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना आमदार भुमरे यांनी दिल्या.
लोहगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ब्रह्मगव्हाण येथील पंप सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मुधलवाडी, एमआयडीसी खुडेगाव येथील पाणी भरण्याच्या पॉइंटवर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यास सांगण्यात आले. अनधिकृतरीत्या पाणी घेतले जात असल्याचे आढळल्यास नियमानुसार पाणीपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

-- रोजगार हमीची कामे थांबवू नका -- 
दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. ज्या गावांमधून रोजगाराची मागणी होईल, तेथे तातडीने कामे सुरू करण्याचे नियोजन करा. नाला खोलीकरण, गाळ काढणे, पाणी अडवा पाणी जिरवा यांसारख्या जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या. कोणत्याही कारणाने रोजगार हमीची कामे थांबणार नाहीत, याची दक्षता घ्या, अशा सूचना आमदार भुमरे यांनी केल्या. 

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील २४ सिंचन तलावांमधील गाळ काढणे आणि नाला खोलीकरणाची कामे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कामांमुळे रोजगारनिर्मितीसोबतच पावसाचे पाणी अडविण्यास आणि भूजलपातळी वाढविण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने कामे करावे असे आमदार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन तांबे, अनिकेत धायकर, सतीश अंधाळे, पंचायत समिती सदस्य दादा गलांडे, प्रदीप नरके, मनोज गायके, किशोर चौधरी, ज्योती काकडे, डी. डी. जाधव यांच्यासह पंचायत समितीचे विविध विभागांचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.