छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे व त्यांच्या पथकाने शासकीय गोदाम व अन्य संस्थांची पाहणी केली. तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाक घर आदी ठिकाणीही पाहणी केली. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार व पोषणमूल्य असलेले अन्न पुरविले जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
राज्य अन्न आयोग सोमवार (दि.१६) पासून जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. अध्यक्ष महेश ढवळे, सदस्य सचिव सुभाष राऊत, बबन मसाले यांच्या पथकाने शालेय पोषण आहार स्वयंपाक घर, इस्कॉन गोदाम, अन्न अमृत फाऊंडेशनचे मध्यवर्ती स्वयंपाकघर आणि शासकीय अन्न गोदामांना भेटी देऊन पाहणी केली. शालेय विद्यार्थ्यांसाठी शिजवण्यात येणार्या अन्नाचा दर्जा, साठवणूक व्यवस्था आणि वितरणाची पारदर्शकता याबाबत बारकाईने तपासणी केली.
यावेळी ढवळे यांनी निर्देश दिले की, आहार शिजवताना त्यात उच्च दर्जाच्या व चांगल्या गुणवत्तेच्या खाद्यपदार्थांचाच वापर करण्यात यावा. मुलांच्या आरोग्याशी तडजोड होता कामा नये. अन्न पुरवठा करणार्या कंत्राटदारांनी आणि संस्थांनी अन्नसामग्रीचा पुरवठा करताना अन्न सुरक्षा मानके कायद्यानुर अन्न पदार्थ्यांची अधिकृत प्रयोगशाळेतुन तपासणी करणे बंधनकारक असून केवळ उत्कृष्ट दर्जाच्या पदार्थांचाच पुरवठा केला जावा, असे सांगितले. पाहणी प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी, शिक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.














