पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा पेपर लीक प्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे. या हायप्रोफाइल प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या हाती असा डिजिटल पुरावा लागला आहे, ज्याने तपासाला नवी दिशा दिली आहे. आरोपी ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यातील तब्बल २७० पानांची व्हॉट्सअॅप चॅट पोलिसांच्या हाती लागली आहे. या चॅटमधून परीक्षा सुरू होण्यापूर्वीच ९१ प्रश्नांची जुळवाजुळव कशी करण्यात आली आणि ५ लाखांची मागणी कशी झाली, याचे काळेबेरे समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता, परीक्षा पद्धतीच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुन्हे शाखा आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कसून चौकशी करत आहे.
२७० पानांच्या चॅटमधून काय समोर आले?
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सहआरोपी लोकेश उर्फ गौरव पाटीलच्या मोबाईलमधून ही २७० पानांची व्हॉट्सअॅप चॅट रिकव्हर करण्यात आली आहे. या चॅटमध्ये २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या एमपीएस सी परीक्षेपूर्वी प्रश्नसंच आणि प्रश्नांच्या देवाणघेवाणीचा संपूर्ण लेखाजोखा आहे. विशेष म्हणजे, आरोपी ऋतुजा पाटील हिने या परीक्षेत ७ वा क्रमांक पटकावला होता, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. ऋतुजा, तिचे वडील अमृत पाटील आणि इतर सहआरोपी सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.
९१ प्रश्नांचा गेम आणि चलाखी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्चच्या चॅटने सर्वांचेच डोळे पांढरे केले आहेत. या चॅटमध्ये ऋतुजा हिने एका प्रश्नसंचातील काही प्रश्न परीक्षेत येणार असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे, कोणाला संशय येऊ नये म्हणून १० प्रश्न जाणीवपूर्वक चुकीचे सोडवण्याची शक्कलही लढवण्यात आली होती. पुढे २२ मार्चच्या चॅटने तर कहरच केला. दिलेल्या प्रश्नांपैकी तब्बल ७८ प्रश्न थेट परीक्षेत आल्याचा दावा ऋतुजाने केला होता. याशिवाय इतर १३ प्रश्न हलवल्याचा उल्लेखही चॅटमध्ये आहे, ज्यामुळे एकूण ९१ प्रश्न आधीच मॅनेज केल्याचा संशय बळावला आहे.
५ लाखांची मागणी अन् वाँटेड मयूर ठाकरेचा सहभाग
या चॅटमध्ये पैशांच्या व्यवहाराचाही पर्दाफाश झाला आहे. पेपरसाठी थेट ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि दुसर्या दिवसापर्यंत ही रक्कम कशी गोळा करायची, याबाबत आपापसांत चर्चा रंगली होती. दुसरीकडे, या गुन्ह्यात वाँटेड असलेला मयूर ठाकरे याचाही या चॅट्समध्ये वारंवार उल्लेख आढळला आहे. हा मयूर ठाकरे नेमका कोण आहे आणि त्याचा या रॅकेटशी कसा संबंध होता, याचा शोध गुन्हे शाखा घेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकरणाची वाच्यता कुणाजवळही करू नये, अगदी घरातील सदस्यांनाही सांगू नका, अशा सूचना ऋतुजाच्या वडिलांनी मयूर ठाकरेला दिल्या होत्या.
ऋतुजाचा मोबाईल उल्हास नदीत फेकला?
तपासाला वेगळे वळण देणारी आणखी एक बातमी म्हणजे, मुख्य आरोपी ऋतुजा पाटील हिने आपला मोबाईल फोन उल्हास नदीत फेकून दिल्याची चर्चा आहे. मोबाईल नष्ट करून पुरावे मिटवण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, गौरव पाटीलच्या मोबाईलमधील २७० पानांच्या चॅटने आरोपींचे मनसुबे उघडे पाडले आहेत. आता गुन्हे शाखा या रॅकेटचे जाळे आणखी किती मोठे आहे आणि यात कोणकोण मोठे मासे गुंतले आहेत, याचा कसून शोध घेत आहे.