पैशाच्या वादातून दोन गटात वाद; १५ - २० वाहने फोडली, २ गंभीर, ४ जखमी, तणावपूर्ण शांतता
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंभई येथे शेळ्या विक्रीचे पैसे दिले नाही यावरून (हिंदू मुस्लिम) या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली त्याचे पर्यावसन दंगलीत झाले. दोन्ही गट समोरा समोर आले. गावातील मुख्य चौकात तुफान मारहाण व दगडफेक झाली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहे.
त्यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सागर भगवान ढगे, विक्रम गव्हाणे (रा. अंभई) हे दोघे डोक्यात दगड लागल्याने व त्यांना बेदम मारहाण झाल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचार कामी रवाना करण्यात आले आहे.
तर राहुल मुंढे, करण मुंढे, अमोल पंडित दतोंडे, पिंटू मुंढे सर्व (रा. अंभई) हे चार जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अंभई गावात पैशाच्या देवाण घेवाण वरून तुफान दगडफेक झाल्याची घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली यामुळे अंभई गावातील व खेड्या पाड्यातील नागरिक अंभईगावात दाखल झाले दोन्ही गटातील जवळपास एक हजार लोकांचा जमाव जमला होता काय झाले हे कुणालाच माहीत नव्हते जो तो दगड लाठ्या काठ्या घेऊन एक मेकांना मारहाण करत दिसत होते गावात गल्ली बोलत दगडांचा खच पडला आहे अनेक दुकान, वाहनाचे यात नुकसान झाले आहे.
काही क्षणात गावातील महिला, मुलं घाबरून घरात दहशत मध्ये थांबल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिनेश कोल्हे, सिल्लोड ग्रामीणचे रवींद्र ठाकरे, शहरचे शेषराव उदार यांच्या सह फरदापुर, सोयगाव पोलीस दंगा काबू पथक अंभई गावात तैनात करण्यात आले असून त्यांनी सौम्य लाठीचार्ज करून जमाव पांगवला व गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. व जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गावात चौका चौकात पोलीस तैनात करण्यात आले यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
-- पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन ---
या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने रात्री पोलीसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठी चार्ज करून कोंबिंग ऑपरेशन केले काही लोकांना ताब्यात घेतले आहे. गावात तणाव पूर्ण शांतता आहे.
१५ ते २० वाहने फोडली. जमावाने गावातील अनेक दुकाणी व रस्त्यावरील मोटारसायकल, काळी पिवळी, क्लुझर, खाजगी वाहनांवर तुफान दगडफेक केली त्यात अनेक वाहनांच्या काचा फुटल्या आहे.











