सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यात डीग्रस गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश आमदार अब्दुल सत्तार यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. अवैध दारूमुळे तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत असून अनेक कुटुंबे अडचणीत सापडत आहेत.
त्यामुळे अशा गैरप्रकारांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. विविध विकास कामांच्या लोकार्पण निमित्त आमदार अब्दुल सत्तार शुक्रवारी (दि.२६) डीग्रस गावात गेले होते. यावेळी त्यांनी गावातील महिलांसोबत संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्यात. उपस्थित महिलांनी गावातील अवैध दारू विक्री थांबवावी अशी मागणी केली.
त्यावेळी त्यांनी लगेच अजिंठा पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल ढाकणे यांना फोन करून तातडीने गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याच्या सूचना दिल्या. गावात बिनधास्तपणे सुरू असलेली दारू विक्री कायदा व सुव्यवस्थेस मोठा धोका ठरत आहे.
यामुळे गुन्हेगारीत वाढ होत असून सामाजिक शांततेवर परिणाम होत आहे. पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, तसेच वारंवार अशा प्रकारात अडकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी अजिंठा पोलिसांना दिल्या. यावेळी त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की, अवैध दारू विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एपीआय अमोल ढाकणे यांनी आमदार सत्तार यांना आश्वासन दिले की, अवैध दारू विक्रीविरोधात विशेष मोहिम राबवण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीत अवैध दारू विक्री गावात होणार नाही. आमदार अब्दुल सत्तार यांची तत्परता आणि पोलिसांनी दिलेल्या आश्वासना नंतर महिला व मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला.














