सोने खरेदी बंद, पेट्रोल जपून वापरा ! मोदींच्या सल्ल्यावर राहुल गांधींची जळजळीत टीका...

Foto
नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी यांनी रविवारी इंधन, खाद्य तेलाच्या काटकसरीचे आवााहन देशवासियांना केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. इंधन टंचाईपासून ते देशाच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जळजळीत टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल त्यांनी मते मांडली. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह अनेक देश जागतिक संकटाला तोंड देत असताना सुजाण नागरिक म्हणून आपण काही गोष्टी करायला हव्यात. पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळावी, परदेशी प्रवास टाळावा तसेच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले.

राहुल गांधी यांची बोचरी टीका...
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर जळजळीत टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केलेले आवाहन हे त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे. मागील १२ वर्षात देशाची स्थिती भयंकर केली असून आता लोकांनी काय करावं, काय करू नये, काय खावं, कुठं जाऊ नये हे लोकांना सांगावं लागत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर थेट घसरण, पण खरेदीत वाढ !!
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये सतत चढउतार बघायला मिळत आहे. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या. मात्र, त्यानंतर सोने स्वस्त झाले. यादरम्यान अनेकांनी हीच योग्य वेळ असल्याचे सांगत जोरदार सोन्याची खरेदी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोन्याचे आजचे भाव पुढे आले आहेत. आज ११ मे २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किमती घसरत आहेत. सतत सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत. त्यामध्येच पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये किंचित घसरण दिसून आली आहे.

आज मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५२,३५० रूपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३९,६५० रूपये आले. जवळपास २०० रूपयांनी सोन्याच्या भावात घसरण नोंदवली गेली. दिल्ली येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५२,५०० तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३९,८०० रूपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली. भारतीयांना मोठे आवाहन करत पुढच्या एक वर्षापर्यंततरी सोने खरेदी करू नका असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

राष्ट्र प्रेमासाठी चांगले वक्तव्य पण बेरोजगारी वाढेल...
वर्षभर सोनं खरेदी न करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोशिएशनच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया आली आहे. सोनं खरेदी बंद करणं ही शक्यता वाटत नाही असे राजेश रोकडे म्हणाले. पंतप्रधानांचं वक्तव्य राष्ट्र प्रेमासाठी योग्य आहे. सोनं खरेदी बंद केल्यास बेरोजगारी वाढेल असं ते म्हणाले. ज्वेलरी इंडस्ट्रीचं जीडीपीत ७ टक्के योगदान आहे. ७० लाख ते १ कोटी कारागिर या क्षेत्रात काम करतात. सोनं खरेदी बंद केल्यास बेरोजगारी वाढू शकते. त्याशिवाय काही जोडधंदेही अवलंबून आहेत. उदहारणार्थ सोनं खरेदी केल्यानंतर लागणारी पर्स, डब्बी, ज्वेलरी बॉक्सेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री यावर अवलंबून आहेत. सोनं खरेदीवर अनेक रोजगार उपलब्ध आहेत असं राजेश रोकडे म्हणाले.