लखनौ : देशात दोन प्रकारच्या हवामानाचा अनुभव येत आहे. बुधवारी, प्रयागराज आणि अयोध्यासह उत्तर प्रदेशातील ३० जिल्ह्यांमध्ये वादळामुळे ९४ लोकांचा मृत्यू झाला. प्रयागराजमध्ये सर्वाधिक १७, तर भदोहीमध्ये १६ मृत्यूंची नोंद झाली. बरेलीत ताशी ८० किमी वेगाने आलेल्या वादळाने एका तरुणाला आणि पत्र्याच्या शेडला उडवून लावले. राज्यातील बांदा शहरात तापमान ४५.४ पर्यंत पोहोचले. आज (१४ मे) ५१ जिल्ह्यांसाठी तीव्र वादळ आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
भदोही जिल्ह्यात भीषण वादळात १५ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात आलेल्या भीषण वादळात १५ जणांचा मृत्यू झाला आणि ८ जण जखमी झाले. या नैसर्गिक आपत्तीत १६ जनावरांचाही बळी गेला. सायंकाळी हवामान अचानक बदलले आणि जोरदार वारे वाहू लागले. या भीषण वादळामुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये झाडे आणि विजेचे खांब कोसळले. भदोहीमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून, त्यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. भदोहीच्या सुरियावान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरगसेनपट्टी येथे एका घरावर झाड कोसळल्याने एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. औराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत, कोसळणार्या झाडाखाली उभे असलेल्या लोकांचा मृत्यू झाला.
राजस्थानमध्येही तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट जाणवत आहे. बुधवारी सलग चौथ्या दिवशी जैसलमेर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले, जिथे तापमान ४६.१ पर्यंत पोहोचले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज बिकानेर, जोधपूर, जैसलमेर आणि बारमेरमध्ये तीव्र उष्णतेसाठी रेड अलर्ट लागू आहे. १३ जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील २५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट
दरम्यान, मध्य प्रदेशातील २५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली असून, ती १८ मे पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. बुधवारी खजुराहोमध्ये तापमान ४५.४ होते. आज इंदूर, उज्जैन, धार आणि रतलाममध्ये उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये रात्री तापमान वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हरियाणात गेल्या २४ तासांत कमाल तापमानात १.१ ने वाढ झाली आहे. राज्यातील ५ शहरांमध्ये तापमान ४० पेक्षा जास्त होते, त्यापैकी नारनौलमध्ये ते ४२.५ होते. राज्यात १७ मे पासून उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारमधील पूर्णिया-कटिहारसह ७ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आज पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.