पैठण, (प्रतिनिधी) : ऐतिहासिक तीर्थक्षेत्र असलेल्या पैठण नगरीत मोकाट कुत्र्यांचा, जनावरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून मोकाट कुत्र्यांनी अनेक शहरात येणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना, लहान बालकांना, वयोवृद्धांना चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
पैठण शहरातील प्रत्येक गल्लीबोळात तसेच मुख्य चौकात छत्रपती शिवाजी चौक, भाजी मार्केट, बस स्थानक चौक, खंडोबा मंदिर परिसर चौक, उद्यान रोड इतकेच नव्हे तर चक्क संत ज्ञानेश्वर उद्यानात ही मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे या कुत्र्यांनी काही दिवसापूर्वीच सकाळी फिरायला जाणाऱ्या एका डॉक्टरवर हल्ला करून त्यांना चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. बस स्थानक चौक परिसरात तर चक्क ही मोकाट कुत्री दुचाकी वाहन चालकांच्या अंगावरून धाऊन जाण्याचा प्रकार दररोज घडत आहे. यामुळे अनेक वाहनधारक खाली पडून जखमी झालेले आहेत.
गल्ल्या बोळ्यात शेकडो पिल्ल्यांचा जन्म :
पैठण शहरात मोकाट कुत्रीनी शहरातील गल्ल्या बोळ्यात शेकडो पिल्लांना जन्म घातला आहे. ही लहान पिल्ले रस्त्यावर आडवी येत असल्याने वाहन चालकांचे अपघात होताना दिसत आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचाही सुळसुळाट वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर चौक, खंडोबा मंदिर परिसर चौक, माहेश्वरी धर्मशाळा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे भर रस्त्यावर ठाण मांडून बसलेली दिसतात. यामुळे रहदारीला अडथळा होतो तसेच अपघाताची शक्यता असते. याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
लसीचा तुटवडा :
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर चावा घेतलेल्या रुग्णाला अँटीसेफ्टी रेबीज चे इंजेक्शन दिले जाते परंतु येथील शासकीय रुग्णालयात अँटीसेप्टि रेबीज च्या इंजेक्शनची कमतरता आहे. कुत्र्याने चावा घेतलेले दररोज १५ ते २० रुग्ण या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. परंतु या रुग्णालयात रेबीजच्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांना मेडिकल मधून जास्त किमतीचे इंजेक्शन विकत घ्यावे लागते. किंवा पिंपळवाडी, नांदर येथील रुग्णालयात जावे लागते. नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच शासकीय रुग्णालयास अँटीसेप्टी रेबीजचे इंजेक्शन मुबलक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावे.
- प्र. पाठक, डॉ. गौतम सव्वाशे.











