भटक्या कुत्र्यांनी तोडले चिमुकलीचे लचके

Foto
साजवार्ता
Date: 21/11/2026
माणुसकीला काळिमा : कचऱ्यात फेकलेल्या मुलीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) जन्मानंतर आई-वडिलांच्या कुशीत सुरक्षिततेचा आणि मायेचा स्पर्श मिळण्याऐवजी अवघ्या काही तासांच्या नवजात मुलीच्या वाट्याला मृत्यू आला. चिकलठाणा एमआयडीसीतील बीएमडब्ल्यू शोरूम परिसरात जन्मदात्यांनी या चिमुरडीला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून कचऱ्यात फेकून दिले. भटक्या कुत्र्यांनी तिचे लचके तोडले. एका कुत्र्याने तिला तोंडात धरून पळ काढला असताना एका जागरूक नागरिकाने धाडस दाखवत तिची सुटका केली; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने शहरात संताप व्यक्त होत आहे.
ही घटना १८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.०५ वाजण्याच्या सुमारास धुत रुग्णालयाच्या पार्किंगपासून बीएमडब्ल्यू शोरूमसमोरील मोकळ्या जागेतील कचऱ्यात घडली. बळीराम गव्हाणे यांनी कुत्र्याच्या तोंडात नवजात बाळ
पाहताच त्याचा पाठलाग करून त्याला हुसकावले. कुत्र्याने चिमुरडीला रस्त्यावर टाकून पळ काढला. गव्हाणे यांनी तत्काळ ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधला. पोलिसांनी बाळाला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, थंडी आणि कुत्र्यांच्या चाव्यांमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मातापित्याचा शोध सुरू
नवजात मुलीला अशा प्रकारे उघड्यावर सोडून देणे हा गंभीर गुन्हा आहे. विवाहबाह्य संबंध अथवा मुलगी नको या मानसिकतेतून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल बिघोत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने या निर्दयी जन्मदात्यांचा शोध घेत आहेत.
चाईल्ड लाईनवर संपर्क साधावा
सामाजिक किंवा अन्य अडचणींमुळे बाळाचा सांभाळ करणे शक्य नसल्यास त्याला कचऱ्यात फेकण्याऐवजी शासकीय पाळणाघर योजनेचा आधार घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ज्योतीनगर येथील 'साकार' आणि गुरुसहानी नगरमधील 'भारतीय समाजसेवा केंद्रा' बाहेर पाळणे उपलब्ध आहेत. तेथे बाळ ठेवून बेल दाबल्यास कर्मचारी त्याचा ताबा घेतात. संकटात असलेल्या बालकांच्या संरक्षणासाठी ११२ किंवा १०९८ या चाईल्ड हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions