हर्षवर्धन जाधव यांना मतदान करून मोदींचे हात बळकट करा; जय बाबाजी भक्‍त परिवाराचे आवाहन

Foto

औरंगाबाद: शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे लोकसभेचे उमेदवार हर्षवर्धन रायभान जाधव यांना मतदान करा आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन श्री श्री 1008 महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या भक्‍त परिवाराच्या राजकीय समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी करीत जय बाबाजी भक्‍त परिवार हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

राजकारणात सध्या भ्रष्टाचार, घराणेशाही, गुन्हेगारीकरण, जातीपातीचे व धर्माचे राजकारण बोकाळले आहे. ही बाब निश्तिच राष्ट्रहिताची नाही. यासाठी शांतगिरीजी महाराज यांनी ‘लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा’ हा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या भक्‍त परिवाराने मराठवाडा, खान्देश व पश्‍चिम महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांना आपला पाठिंबा दिला आहे. यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. याशिवाय, भक्‍त परिवार स्वखर्चातून 50 वाहनांच्या माध्यमातून जाधव यांचा जिल्हाभर प्रचार करणार असल्याचे पवार म्हणाले. हर्षवर्धन जाधवांना जाहीर केलेला पाठिंबा हा विचाराअंती घेतलेला निर्णय आहे. यासाठी स्वतंत्र राजकीय समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये राजेंद्र पवार, झुंबर मोडके, कैलास बोराडे, नितीन सरकटे, गणेश बोराडे यांचा समावेश होता, असेही ते म्हणाले.

माझा आजच नैतिक विजय झाला
जय बाबाजी भक्‍त परिवाराने माझ्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी माझ्यावर टाकलेल्या या विश्‍वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. मी आपला हक्‍काचा खासदार म्हणून काम करेल. राहुल गांधी निश्‍चितच पंतप्रधानपदाच्या लायकीचा माणूस नाही. त्या पदासठी नरेंद्र मोदी हेच सक्षम आहेत. यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठीच माझा प्रयत्न असेल.                      हर्षवर्धन जाधव, उमेदवार