दसऱ्यापर्यंत कर्णकर्कश ध्वनीवर कडक निर्बंध !

Foto

पोलिस आयुक्तालय हद्दीत डीजे, डॉल्बीला बंदी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो):
गणेशोत्सव ते दसरा या सणासुदीच्या काळात डीजे, डॉल्बी आणि कर्णकर्कश ध्वनी यंत्रणेला पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नो एन्ट्री करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेऊन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. १९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका, धम्मचक्र प्रवर्तन दिन, घटस्थापना, नवरात्रोत्सव आणि
दसरा या काळात टॉप, मिड, बेस अशा मल्टीस्पीकर डॉल्बी सिस्टीम, प्लाझ्मा तसेच प्रेशरमिड साऊंड सिस्टीमच्या वापरास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
अशा साऊंड सिस्टीम बसविण्यासाठी मॉडिफाय केलेल्या वाहनांवरही नजर राहणार पोलिसांची आहे. डीजेच्या अतितीव्र आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्यासोबतच मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील निर्धारित मर्यादांचे
पालन करणाऱ्या कायदेशीर साऊंड सिस्टीमना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
दणदणाटामुळे जीवितास धोका
डीजेच्या दणदणाटामुळे नागरिकांना कानाचा, छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व येणे, तसेच जीवितास धोका निर्माण होण्यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. तसेच साऊंड सिस्टीम लावण्यावरून तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर बीएनएस कलम २२३ तसेच प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
मॉडिफाय वाहने सीलबंद ठेवा
साऊंड सिस्टीमचे चालक तसेच मंडळांच्या मालक, गणेशोत्सव आयोजकांनी संबंधित साऊंड सिस्टीम आणि मॉडिफाय वाहने स्वतःच्या ताब्यात सीलबंद स्थितीत ठेवावीत. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वापर करण्यास किंवा इतरांच्या ताब्यात देण्यासही मनाई करण्यात आली आहे.
प्रवीण पवार, पोलीस आयुक्त