नवी दिल्ली, दि.27 (वृत्तसंस्था): भारतीय शास्त्रज्ञांनी आज क्षेपणास्त्राच्या मदतीने अवघ्या तीन मिनिटांमध्ये अंतराळातील एक उपग्रह पाडण्यात यश मिळवले असून, अंतराळात क्षेपणास्त्रांचा मारा करून अशी कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला आहे. ‘मिशन शक्ती’ अंतर्गत करण्यात आलेल्या या यशस्वी कामगिरीमुळे भारत हा अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती बनला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करताना ही माहिती दिली.
रेडिओ, टीव्ही, सोशल मीडियाद्वारे देशवासियांशी साधणार संवाद साधून एक मोठी घोषणा करणार असल्याची माहिती खुद्द पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ट्विटरद्वारे दिली होती. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी कोणती घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भारताच्या ए-सॅट क्षेपणास्त्राने आज अंतराळात 300 किलोमीटर उंचीवरील उपग्रह (लाइव्ह सॅटेलाईट) उद्ध्वस्त करून अंतराळ क्षेत्राच्या इतिहासात मोठी झेप घेतली. लो अर्थ ऑर्बिटमध्ये 300 किलोमीटर अंतरावरून अचूक लक्ष्यभेद करून केवळ तीन मिनिटांमध्ये हा उपग्रह पाडण्यात आला. डीआरडीओच्या शास्ज्ञज्ञांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका निभावली. भारतीय शास्त्रज्ञांनी ‘मिशन शक्ती’ अंतर्गत ही मोहीम यशस्वी केली. भारत आज अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती बनला असून, अशी कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, चीन, रशियानंतर जगातील चौथा देश ठरला आहे. ‘मिशन शक्ती’ हे अभियान अत्यंत क्लिष्ट होते;पण भारतीय शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करून क्षेपणास्त्राच्या सहाय्याने केवळ तीन मिनिटांत उपग्रह पाडण्यात यश मिळवले आहे. देशासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी बजावलेल्या या कामगिरीबद्दल समस्त भारतीयांना त्यांचा अभिमान वाटतो, असे सांगून ‘मिशन शक्ती’ यशस्वी करणार्या शास्त्रज्ञांचे मोदींनी अभिनंदन केले. मोदी म्हणाले, या मिशनमुळे भारताला नवी ताकद मिळाली आहे. अंतराळ क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. आतापर्यंत तीन देशांकडे ही शक्ती होती. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतही अशी शक्ती मिळवणारा चौथा देश ठरला आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मोठे यश आहे. या अभूतपूर्व यशामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, तंत्रज्ञानाच्या बाबतही भारत प्रगतिशील राहणार आहे.
आम्हाला जगात शांतता हवी;आमचा युद्धाचा हेतू नाही -मोदी
अंतराळ क्षेत्रात भारताने आज आपला झेंडा रोवला आहे, रशिया, अमेरिका आणि चीनने या पूर्वी अशा स्वरुपाची कामगिरी केली होती. ’मिशन शक्ती’मुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झालेले नाही. आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही. अंतराळ क्षेत्रात भारताने टाकलेले हे मोठे व महत्त्वाचे पाऊल आहे. आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही. आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही. आम्ही भारताच्या नागरिकांची आणि देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवली, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.