गुंठेवारीच्या नियमितीकरणाला जोरदार प्रतिसाद; चार महिन्यांत मनपाच्या तिजोरीत ८४ कोटी जमा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अनधिकृत भूखंड आणि बांधीव घरे नियमित करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या सवलतीच्या काळात केवळ चार महिन्यांत ९ हजारांहून अधिक फाईल्स दाखल झाल्या आहेत. दरम्यान, ही सवलत मिळण्याची शेवटचीच संधी असून, ३१ ऑक्टोबरनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांसमोर कागदपत्रे व शुल्क भरण्यासाठी
आता अवघे काही दिवस उरले आहेत.
आयुक्त येडगे म्हणाले की, गुंठेवारीसाठी १५ जुलैपासून सवलत योजना लागू केलेली आहे. १५ जुलै ते २३ ऑक्टोबरपर्यंत गुंठेवारी करून घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे. या कालावधीत दाखल झालेल्या ९०३९ फाईल्स पैकी ४८०० पेक्षा जास्त मंजूर झाल्या आहेत. तर ८४ कोटींचा महसूल महापालिकेला मिळाला आहे. आता मुदत संपण्यास आणखी ८ दिवस शिल्लक आहेत. गुंठेवारी नियमितीकरणातून जमा
होणारा निधी त्याच भागातील विकासकामांवर हा निधी खर्च करण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही आयुक्त येडगे यांनी स्पष्ट केले.
४ हजार फाईल्स दाखल
१५ जुलैपासून सवलत लागू करण्यात आलेली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत ही सवलत राहणार आहे. जुलै महिन्यात ३१४ फाईल्स दाखल झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात १,३०० फाईल्स, सप्टेंबरमध्ये ३,५०० फाईल्स तर ऑक्टोबर महिन्यात सुमारे ४,००० फाईल्स दाखल झालेल्या आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions