छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनने छत्रपती संभाजीनगर शहरात दमदार हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला आहे. मंगळवारी सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. आज सकाळी दुसर्यादिवशीही पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार रात्री ११.३० वाजेपर्यंत २३.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दिवसभर शहरात कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवेत आर्द्रतेचे प्रमाण ७७ टक्के असल्याने दिवसभर प्रचंड उकाडा जाणवला. मात्र सायंकाळी अचानक वातावरण बदलल्याने पावसाने दमदार सुरुवात केली. गेल्या तीन आठवड्यांपासून शहर आणि जिल्ह्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. शेतकरी वर्ग चिंतेत होता. अनेक भागांत पेरणी रखडली आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली ओल जमिनीत नसल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. अशा परिस्थितीत झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामाला बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज दुसर्या दिवशीही सकाळीच पावसाने दमदार हजेरी लावली.
आज सकाळी शहरातील सिडको, मुकुंदवाडी, जालना रोड, सातारा परिसर, देवळाई, उस्मानपुरा, गारखेडा, क्रांती चौक, निराला बाजार, रेल्वे स्टेशन परिसर तसेच मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाचा जोर इतका होता की वाहनचालकांना हेडलाईट सुरू करून प्रवास करावा लागला. रस्त्यांवर पाणी साचल्याने दुचाकीस्वार आणि पादचार्यांची मोठी गैरसोय झाली. पावसामुळे शहरातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. दिवसभर असलेला उकाडा कमी होऊन गारवा निर्माण झाला. नागरिकांनी पावसाचा आनंद घेतला. अनेक ठिकाणी युवक आणि लहान मुले पावसात भिजताना दिसून आली. चहाचे स्टॉल, भजी विक्रेते आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवरही नागरिकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागात दिलासा
ग्रामीण भागातही या पावसाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. शेतकर्यांनी पावसाचे स्वागत केले असून आता पुढील काही दिवस सातत्याने पाऊस झाल्यास खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग मिळणार आहे. सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि इतर पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. मान्सूनच्या आगमनाने शहर आणि जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण झाले असून पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. उशिराने का होईना, पण झालेल्या या दमदार पावसामुळे आगामी दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची आशा बळावली आहे.
पाऊस एक तास; लाईट सहातास गुल
मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावताच विजेचा लपंडाव सुरू झाला. वादळ, वारे सुरू होताच शहरातील बर्याच भागात लाईट गुल झाली. पाऊस रात्री सुरू होताच एक तास पडला. आणि बर्याच भागात सहातास लाईट गुल झाली. त्यामुळे बर्याच भागात नागरिकांना अंधारात राहावे लागले. अनेकांनी एकमेकांना तुमच्याकडे लाईट गेली का? अशी विचारणा केली. त्यामुळे अनेकांचे रात्री उशिरापर्यंत फोन खनानले. इतकेच नव्हे तर काहींनी महावितरण विभागालाही फोन लावुन लाईट कधी येईल अशी विचारणा केली.