छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): राज्यात सातत्याने समोर येत असलेल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार आवाज उठविला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा, पेपरफुटी रोखा, दोषींना कठोर शिक्षा करा अशा घोषणांनी आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणून गेला. या आंदोलनासाठी कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके दिल्लीहून आले होते.
विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील मैदानात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राज्यातील विविध जिल्ह्यांतील हजारो स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी सहभागी झाले. गेल्या काही वर्षांपासून राज्यात विविध रखडलेली भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार पेपरफुटीची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, शिवाय त्यांच्या वेळेचा, मेहनतीचा आणि आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे परीक्षांची तयारी करत असताना परीक्षा रद्द होणे, पुढे ढकलणे किंवा पेपरफुटीमुळे पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी कृती समितीने हे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
पेपरफुटी करणार्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्या, भरती प्रक्रिया पारदर्शक करा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलकाने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विद्यार्थी कृती समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेली पेपरफुटी ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. प्रत्येक परीक्षेनंतर पेपरफुटीची भीती विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत आहे. अनेक विद्यार्थी कर्ज काढून, नोकरी सोडून किंवा इतर गोष्टींचा त्याग करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र काही मोजक्या व्यक्तींच्या गैरप्रकारामुळे त्यांचे वर्षानुवर्षांचे परिश्रम वाया जात आहेत. त्यामुळे आता सरकारने केवळ चौकशी न करता दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना होणार नाहीत, याची हमी द्यावी. यासाठी मार्गदर्शक म्हणून विठ्ठल कांगणे यांनी सहभाग नोंदविला. तसेच आ.रोहित पवार, अभिजित दिपके, रविराज साबळे, विठ्ठ्ल कांगणे, दिपक केदार, रविकांत तुपकरे, ज्ञानेश्वर बोराडे, यांच्यासह हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी एमपीएससी परीक्षा ऑफलाईन झालीच पाहिजे, पोलीस भरती लवकर झालीच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
या आहेत मागण्या
आंदोलनकर्त्यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थी आणि शिक्षक भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइनच घेण्यात याव्यात, कारण ऑनलाइन प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक शंका आणि तक्रारी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. याशिवाय पोलीस भरतीची जाहिरात डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध करावी, वनरक्षक भरतीची प्रक्रिया देखील डिसेंबरपूर्वी सुरू करावी, रखडलेल्या विविध भरती प्रक्रियांना गती द्यावी, परीक्षा वेळेत घेऊन निकालही निश्चित कालावधीत जाहीर करावेत, सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक, वेळेत आणि पेपरफुटीमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात तसेच पेपरफुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी. अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी प्रशासनासमोर मांडल्या.
मटका फुटत नाही परंतु पेपर रोज फूटतो
आतांची परिस्थिती अशी झाली आहे की, इथे मटका लवकर फुटत नाही. परंतु पेपर रोज फुटतो. विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा खेळखंडोबा थांबला पाहिजे. एमपीएससी परीक्षा ऑफलाइन झालीच पाहिजे. असे सूर यावेळी उमटले. तसेच विद्यार्थी आंदोलन करताये गुन्हा थोडीच करत आहे. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त कशासाठी? असा प्रश्न आ. रोहित पवार यांनी उपस्थित केला.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
विद्यार्थी कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थी आंदोलन असल्याने क्रांती चौक येथे सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. याशिवाय विभागीय आयुक्त कार्यालयासमोर देखील शेकडो पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.