ज्या हातात पाटी आणि पेन्सिल, पाठीवर दप्तर घेण्याची वेळ असते त्या हातात काही चिमुकल्या मुलांच्या पाठीवर कामाचे ओझे असते, हातात काम असते. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे या चिमुकल्या मुलांच्या वाटेला काम येते. काही मुले गरिबीमुळे अर्धवट शिक्षण सोडतात. अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षिका रत्नप्रभा सतीश बहाळकर यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मुले आज शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम देखील करत आहेत. हे त्यांच्या मेहनतीचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षक दिनानिमित्ताने सिडको एन-7 येथील मनपा शाळेतील शिक्षिका गेले अनेक वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबर शाळा बाह्य मुलांना देखील त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रत्नप्रभा यांच्या आई-वडील घरात शिक्षक असल्याने विद्यार्थी घडविण्यासाठी आई-वडील कसे काम करतात. ते त्यांनी लहानपणापासून पाहिले होते. तेव्हापासून आपणही शिक्षकच व्हायचे असे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिक्षक होण्याचे धडे गिरविले आणि पदवी घेऊन त्यांनी 1984 पासून शिक्षण क्षेत्रात सेवा करणे सुरू केले. पालघर येथील एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून त्यांनी काम करणे सुरू केले. आणि 1993 नंतर जिल्हा परिषद आणि मनपा शाळेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर औरंगाबाद शहरात मनपा शाळेत काम करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून आतापर्यत अनेक मुलांना त्यांनी घडविले.
शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणले
जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत इंडस चाईल्ड लेबर प्रोजेक्ट मध्ये रत्नप्रभा यांनी पाच वर्षे काम केली. तसेच त्यात जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांसाठी शाळा तयार करून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्य केले. तसेच भाऊ दीदी प्रकल्पअंतर्गत काम केले. त्यात 99 भाऊ-दीदी नेमून 1600 शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले. आतापर्यंत यातील काही मुले विविध पदावर देखील काम करत आहेत.