विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक आकाशदिवे; दिवाळीनिमित्त कलाविष्काराचे सादरीकरण

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अत्यंत आकर्षक आणि पर्यावरण पूरक आकाशदिवे बनवले. शाळेच्या कला व कार्यानुभव विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी या आकाशदिव्यांची निर्मिती केली.

शाळकरी मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला आणि पारंपरिक सणांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या उपक्रमात प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर पूर्णपणे वर्ज्य करण्यात आला होता. 

त्याऐवजी कागद, बांबूच्या काड्या, लाकडाचा पुठ्ठा, विविध रंगीत कागद, जुनी वर्तमानपत्रे, सुती कपड्यांचे तुकडे, सुकलेली पाने, फुले, जुन्या टाकाऊ वस्तूपासून इकोफ्रेंडली साहित्याचा वापर करून आकाशदिवे तयार करण्यात आले. पारंपरिक किल्ल्यांचे आकार, आधुनिक नक्षीकाम, करंजी आकाराचे व षटकोनी नक्षत्रांच्या समावेश होता. आकाशदिव्यांचा विद्यालयाच्या कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बांबूच्या काड्यांपासून सांगाडा तयार करणे, कागद चिकटवणे आणि त्यावर आकर्षक नक्षीकाम करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनी ४ ते ५ जणांचे गट करून एकत्र काम केले, 

ज्यामुळे त्यांच्यात संघभावना आणि एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती वाढीस लागली. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या
सुंदर आकाशदिव्यांचे प्रदर्शन सध्या शाळेच्या आवारात भरवण्यात आले असून, ते पाहण्यासाठी नागरिक व पालकांनी गर्दी होत आहे. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन डमाळे, मुख्याध्यापक निशांत म्हस्के यांनी विद्यार्थ्यांच्या या कलेचे कौतुक करत त्यांना आगामी दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.

तर या उपक्रमासाठी शिक्षक राजू गाढवे, भाऊसाहेब गावंडे, गणेश सुरडकर, रामेश्वर वाघ, अमोल पालोदकर, पंकज सावंत, अमोल दांडगे, गणेश चव्हाण, मीरा पांगळे, शितल गीते, सुवर्णा तारो यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.