विद्यार्थ्यांनी गरिबीचे भांडवल करू नये : सुनील लांजेवार

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे श्रम वेळ आणि बुद्धी यांचा योग्य समन्वय साधून यश प्राप्त केले पाहिजे. कुठल्याही अभावग्रस्ततेचे कारणे सांगून पळ काढणे हे लांछनास्पद आहे. विद्यार्थ्यांनी गरिबीचे भांडवल करू नये असा मोलाचा सल्ला पोलीस उपायुक्त सुनील कृष्णा लांजेवार यांनी व्यक्त केले.


ते प्रतिष्ठान महाविद्यालयात झालेल्या कै. खंडेराव पाटील शिसोदे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध दैनंदिनीचा उल्लेख करताना त्यांनी संस्कृतमधील सुभाषितांचा दाखला देत प्रत्येक काळात विद्यार्थ्यांच्या वाट्याला शिक्षण घेत असताना हालअपेष्टा येतच असतात पण त्यावर मात करून अनेक विद्यार्थी पुढे यशस्वी उद्योजक, राजकारणी आणि महापुरुष झाले आहेत. 

आपणही असे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रसेन कोठावळे यांनीही विद्यार्थ्यांना खंडेराव पाटील सिसोदे यांच्या कार्याचा धांडोळा घेत प्रेरित केले. 

प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे १९६५ मधील विद्यार्थी जनार्दन नवसागर यांची या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. त्यांनी प्रतिष्ठान महाविद्यालयातील त्यांच्या विद्यार्थीदशेच्या आठवणी जागृत केल्या. याप्रसंगी संस्थेचे सचिव राजेंद्र पाटील शिसोदे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. 

स्मृतिदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील शिसोदे, संचालक श्रीधरराव पाटील शिसोदे, विजयकुमार पाटील शिसोदे, सुशील पाटील शिसोदे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य एस. जी. सोनकांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. हंसराज जाधव यांनी सूत्रसंचालन तर आभार डॉ. नूतन जोनवाल यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.