छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गरवारे कम्युनिटी सेंटर आणि राजा रवि वर्मा चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गरवारे बाल भवन येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेली ही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीची परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली. कार्यशाळेत सुमारे ११० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मातीच्या गोळ्याला आपल्या कल्पकतेने आकार देत शाडू मातीपासून सुंदर व आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. प्रसिद्ध चित्रकार प्रा. डॉ. उदय भोईर यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती
निर्मितीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी
कागद, कार्डशीट, रंगीत कागद, आईस्क्रीम स्टिक, पुठ्ठा, क्राफ्ट पेपर आदी सहज उपलब्ध व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून विविध प्रकारची आकर्षक मखरे तयार केली.
शालवी दंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी मखर निर्मितीच्या
विविध पद्धती आत्मसात केल्या. पारंपरिक सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून पुनर्वापर करता येणाऱ्या तसेच पर्यावरणाला कमी हानी पोहोचविणाऱ्या साहित्याचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या दोन्ही कार्यशाळा गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडल्या.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















