विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील; २ दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक

Foto
पुणे : पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. आंदोलनात विविध मागण्यांमुळे तीन गट पडलेत. मात्र एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन की राजकीय आखाडा? अशी स्थिती निर्माण झाली आहे. हर्षवर्धन सपकाळांपासून ते संजय राऊतांपर्यंत अनेक पक्षांच्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. स्वत: शरद पवारांनीही या आंदोलनात लक्ष घातलेलं आहे. आता आज दुपारी ४ वाजता मनसेप्रमुख राज ठाकरे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील हे देखील या आंदोलनाला भेट देणार आहेत. याचदरम्यान, एमपीएससीच्या आंदोलनात पहिल्या दिवसांपासून सहभागी असलेले शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

आज राज ठाकरे संवाद साधणार...
सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी आवाहन केल्याप्रमाणे पुणे शहर ठप्प होऊ शकतं. आता हे एमपीएससीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक ठरवतील. त्यावेळी पुणेकरांनी या विध्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा. ७ किंवा ८ ऑक्टोबरला राहुल गांधी येण्याची शक्यता आहे. त्यादिवशी १ लाख विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर असतील, असा आमचा अंदाज आहे. एक तर हे विद्यार्थी पुणे बंद करतील किंवा मुंबईत मंत्रालयावर धडकतील, असं रोहित पवार म्हणाले. आज राज ठाकरे, आदित्य ठाकरे आंदोलनात येणार आहेत. सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम देतोय, असा इशाराही रोहित पवारांनी दिला. 

विद्यार्थ्यांचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नाही- रोहित पवार 
विद्यार्थ्यांचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नाही, हे माझे मित्र आणि मंत्री नितेश राणे जी यांनी व्यक्त केलेल्या भावनेशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत आणि सत्याग्रह आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही हेच सांगतोय. पण दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाचेच काही आमदार या विषयाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतायेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करण्याबाबत आपण त्यांनाही कानपिचक्या दिल्या तर बरं होईल, असं रोहित पवारांनी सांगितले. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नाचं मूळ ठरलेल्या  चे भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन या संस्थेतील भ्रष्टाचाराची साफसफाई करण्याची मागणी नितेश जी तुमच्या सरकारकडं करा..असं केलं तर माझ्यासह सगळे विद्यार्थी तुमचे आभार मानल्याशिवाय राहणार नाहीत. राहिला प्रश्न आपण सोबत मंत्री बनण्याचा, तर याचा अर्थ तुम्ही भाजपला ङ्गरामरामम करत आहात असं आम्ही समजायचं का?, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.