औरंगाबाद लोकसभेसाठी सुभाष झांबड प्रबळ दावेदार, महत्त्वाच्या बैठकीत सत्तार गैरहजर

Foto

औरंगाबाद – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील ८ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक मुंबईत झाली. या बैठकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुभाष झांबड यांच्या नावाला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. आमदार झांबड हेच काँग्रेससाठी योग्य उमेदवार असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष नामदेवर पवार, भाऊसाहेब ठोंबरे, किरण डोणगावकर यांनी पक्षाच्या बैठकीत सांगितले आहे. त्यासोबतच औरंगाबादची जागा ही काँग्रेसच लढवू शकते आणि जिंकू शकते असा विश्वासही पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे. विशेष म्हणजे औरंगाबादचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार मात्र या बैठकीत गैरहजर होते. 

औरंगाबाद लोकसभा काँग्रेसच लढवणार
प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसची लोकसभा आढावा बैठक झाली. मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघाचा यावेळी आढावा घेण्यात आला. औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेस लढवत आली आहे, मात्र मागील २० वर्षांपासून येथे ते पराभूत होत असल्यामुळे ही जागा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी अशी मागणी मागील काही महिन्यांपासून पुढे येत आहे. यावर या बैठकीत चर्चा झाली, असल्याचे आमदार सुभाष झांबड यांनी 'सांजवार्ता ऑनलाईन'शी बोलताना सांगितले. 

औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पवार, माजी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, भाऊसाहेब ठोंबरे, किरण डोणगावकर यांनी औरंगाबादची जागा काँग्रेसनेच लढली पाहिजे यावर ठाम होते. जिल्ह्यातील पदाधिकारी एकत्र येऊन एकदिलाने लढले तर काँग्रेस येथे जिंकू शकते असा विश्वास त्यांनी प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रभारींना दिला. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी लोकसभेसाठी विधान परिषदेतील आमदार सुभाष झांबड हे योग्य उमेदवार असल्याचेही वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले. पक्षाची जाहीर सभा आणि इतर कार्यक्रमांकडे आमदार झांबड यांनी मागील काही दिवसांपासून दूर्लक्ष केले होते. यासंंबंधी त्यांना विचारले असता ते, प्रकृती बरी नसल्यामुळे मी कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले.  

सत्तार यांची गैरहाजरी
औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. याबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र मागील काही दिवसांपासून आमदार सत्तार आणि आमदार झांबड यांच्यातील वादाची किनार त्यांच्या अनुपस्थिती मागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात झालेल्या एल्गार यात्रेला सुभाष झांबड अनुपस्थित होते. या सभेचा फज्जा उडाला आणि त्याचे खापर सत्तार यांच्यावर फुटले होते. त्यानंतर क्रांतीचौकात नोटबंदी निषेधार्थ झालेल्या निदर्शनाकडेही झांबड यांनी पाठ फिरवली होती. या क्रार्यक्रमाची वेेळ आणि स्थळ याबद्दल काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्येच संग्रम निर्माण झाल्यानंतर आमदार सत्तार यांनी, आमच्याकडे दोन कामे शिल्लक करणारे लोक जास्त असल्याचे म्हटले होते. शहर आणि जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये या दोन्ही नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. सत्तार यांच्या अनुपस्थितीला या वादाची पार्श्वभूमी आहे का, अशीही चर्चा सुरु आहे.

शहरात काँग्रेला जोर लावण्याची गरज
जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम केले तर औरंगाबाद लोकसभा जिंकणे अवघड नसल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागात काँग्रेस अजूनही मजबूत असल्याचे सांगत चव्हाण यांनी शहरात अधिक काम करण्याची गरज असल्याचे व्यक्त केले, असल्याचे समजते. औरंगाबादमधील जनतेला बदल हवा असून काँग्रेसने सक्षम उमेदवार दिल्यास यश नक्की मिळेल असे नामदेव पवार, केशवरराव औताडे, भाऊसाहेब ठोंबरे, किरण डोणगावकर, मिलिंद पाटील, जितेंद्र देहाडे यांनी श्रेष्ठींपर्यंत पोहोचवले आहे. आता काँग्रेस लोकसभेची उमेदवारी कोणाला देते आणि अंतर्गत धुसफूस कशी शांत करते यावरच पुढील समीकरणे अवलंबून असणार आहे.