निवडणूक खर्च सादर करा, अन्यथा सदस्यता धोक्यात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी प्रच-ारासाठी झालेल्या खर्चाचा तपशील ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक असून, १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक आयोगाकडे जमा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले आहे. विहित मुदतीत हिशेब न दिल्यास संबंधित सदस्यांची सदस्यता रद्द होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
निवडणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक उमेदवाराने प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाचा तपशील नियमानुसार सादर करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. त्यामुळे १९ जानेवारी रोजी झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना खर्च तपशील सादरीकरणाबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उमेदवारांना वेळोवेळी सूचना देऊन खर्चाचा हिशेब सादर करण्यास प्रवृत्त करावे. यासह प्राप्त अहवालांची तपासणी व नोंद प्रक्रिया नियमानुसार राबवावी, असे निर्देश देण्यात आले होते. १० फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यावेळीही आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी खर्चाचा तपशील १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
४७२ जणांनी सादर केला खर्च
मुख्य लेखा परीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारीपर्यंत ८५८ उमेदवारांपैकी ४७२ जणांनी निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला आहे. ५० टक्के सदस्यांनी अद्याप अहवाल सादर केलेला नाही. ज्या सदस्यांनी अद्याप खर्चाचा तपशील सादर केलेला नाही, त्यांनी विहित मुदतीपूर्वी तो सादर करावा, अन्यथा कायद्यानुसार सदस्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त जी. श्रीकांत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.