औरंगाबाद : सोशल मीडियावरील युद्धात आणि माउथ पब्लिसिटीत हरलेले खैरे जिंकणार असल्याचे भाकीत विविध वाहिन्यांवरील एक्झिट पोल मध्ये करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात बोचऱ्या टीकेने घायाळ शिवसैनिकांसाठी ही आनंदाची बातमीच ठरली. मतमोजणीला दोन दिवस शिल्लक असताना आकाशवाणी चौकात चंद्रकांत खैरे यांच्या विजयाचे पोस्टर झळकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सलग चार लोकसभा निवडणुका थाटात जिंकलेल्या चंद्रकांत खैरेना यावेळी मोठ्या रोषाला तोंड द्यावे लागले. शहरातील कचरा, पाण्याचा प्रश्न यासह विकासाच्या मुद्द्यावर खासदार खैरे यांची बोलती बंद करण्यात विरोधकांना यश आल्याचे दिसले. त्यातच मित्र पक्षातील बंडखोरी आणि तब्बल तीन आमदारांचा सामना खैरेंना करावा लागला. एकीकडे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आणि दुसरीकडे जातीवर झालेले मतदान यामुळे खासदार खैरे जिंकतील का ? हाच प्रश्न चर्चिला गेला. सोशल मीडियावर तर खैरेंचा टिकाव लागला नाही, माऊथ पब्लिसिटीतही खैरे अक्षरशः पराभूत झाले. अशा परिस्थितीत खैरेंचा विजय शिवसेनेला नवसंजीवनी देणारा ठरेल, यात शंका नाही.
ना हरा... ना पिला...
आकाशवाणी चौकात लक्ष्मण गिऱ्हे नावाच्या शिवसैनिकाने लावलेले पोस्टर चर्चेचा विषय बनले आहे. ना हरा.. ना पिला... संभाजीनगरात फक्त भगवाच... असा मजकूर लिहिलेली ही पोस्टर खैरेना विजयश्री मिळाल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत. तर विजयाची खून दाखवितानाचा खैरेंचा आकर्षक फोटोही येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हिरवा की भगवा, खान की बाण... या वादालाही या पोस्टरद्वारे फोडणी दिली गेली. एकाच वेळी इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव या दोघांवरही या पोस्टरमधून निशाणा साधण्यात आला आहे.परवा गुरुवारी मतमोजणी होईल त्यानंतर कोण जिंकेल हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे घोडामैदान सामने आहे एवढेच खरे.....